लोकसभा निवडणुकीला राज्यात महायुतीला साथ देण्यासाठी राज ठाकरे बिनशर्त आले होते. लोकसभेला भाजपाला अपेक्षित निकाल आला नसला तरी यासाठी अजित पवारांना सोबत घेतल्याने नुकसान झाल्याचे तर्क भाजपा, शिवसेनेकडून काढण्यात आले. त्यानुसार गेले १०० दिवस अजित पवारांना टार्गेट केले जात आहे. अशातच एनडीएचे घटकपक्ष राहिलेले रामदास आठवले यांनी अजित पवारांना नाही तर राज ठाकरेंना सोबत घेऊ नका असा सल्ला भाजपाला दिला आहे.
राज ठाकरेंचा महायुतीला फायदा झालेला नाही. अजित पवारांमुळे महायुतीचे काहीही नुकसान झालेले नाही. ज्या १७ जागा आल्या आहेत त्यात अजित पवारांचाही वाटा आहे. पण राज ठाकरेंना सोबत घेऊ नका. मी तुमच्यासोबत असल्याने राज ठाकरेंची महायुतीत गरज नाही, असे वक्तव्य आठवले यांनी केले आहे.
केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले आज पालघरच्या दौऱ्यावर आले होते. तेव्हा त्यांनी पत्रकार परिषदेत हे वक्तव्य केले. यावेळी त्यांनी राहुल गांधींच्या आरक्षण संपविण्याच्या वक्तव्याचाही समाचार घेतला. राहुल गांधी आणि त्यांचा काँग्रेस पक्ष संपेल पण देशातील आरक्षण कदापी संपणार नाही, असे आठवले म्हणाले. तसेच अशी वक्तव्ये करणे त्यांना शोभत नाही, अशी टीकाही केली. राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करावा अशी मागणी आठवले यांनी केली.
राज ठाकरेंनी लोकसभा निवडणुकीवेळी विधानसभेच्या २८८ जागांच्या तयारीला लागा असे आदेश मनसैनिकांना दिले होते. तसेच लोकसभा निवडणुकीत मोदींना पंतप्रधान बनविण्यासाठी बिनशर्त पाठिंबा देत भाजपाच्या उमेदवारांसाठी प्रचारसभाही घेतल्या होत्या. या लोकसभा निवडणुकीत भाजपाला अवघ्या ९ जागा जिंकता आल्या होत्या. आता पुन्हा राज यांना विधानसभेला सोबत घेतले जाणार का असा प्रश्न उपस्थित होत होता. राज यांच्या पक्षाचा एकमेव आमदार आहे. राज यांना मानणारे अनेक कार्यकर्ते आहेत. परंतू, या ताकदीचा फायदा त्यांना निवडणुकांमध्ये होत नाही.