मुंबई : लोकसभा निवडणुकीत विजयी उमेदवारांच्या मिरवणुकांवर मुंबई पोलिसांची बंदी नाही. मात्र, या मिरवणुकांसाठी संबंधित यंत्रणांची परवानगी घ्यावी लागेल, असे मुंबई पोलिस दलाने स्पष्ट केले आहे. लोकसभा निवडणुकीचा निकाल येत्या शुक्रवारी लागणार आहे. मुंबईच्या सहा मतदारसंघांतील मतमोजणी चार ठिकाणी सकाळी आठपासून सुरू होईल. टप्प्याटप्प्याने त्या त्या उमेदवाराला पडलेली मते जाहीर होती व निकालाचा अंदाज घेऊन मोठ्या संख्येने संबंधित पक्षाचे कायकर्ते या केंद्रांवर जमा होतील. यावेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न लक्षात घेऊन मतमोजणी केंद्रांपासून विजयी मिरवणुका काढू नका, असे आवाहन मुंबई पोलीस विजयी उमेदवार आणि त्याच्या कार्यकर्त्यांना त्यावेळी करणार आहे. विजयी उमेदवाराच्या मिरवणुकीवर मुंबई पोलिसांनी बंदी घातल्याची अफवा बुधवारी पसरली होती. त्याबाबत मुंबइ पोलीस दलाचे प्रवक्ते उपायुक्त महेश पाटील यांना विचारले असता ते म्हणाले, बंदी नाही; मात्र मिरवणुकांसाठी आवश्यक असलेली परवानगी त्या त्या यंत्रणांकडून घेणे मात्र बंधनकारक असेल. आमच्याकडे अजून एकाही पक्षाचा विजयी मिरवणुका काढण्यास अर्ज आलेला नाही. मिरवणुका काढायच्या असल्यास त्यांना आमच्याकडे अर्ज करावा लागेल अन्यथा वाहतुकीचा बोजवारा उडू शकतो, हे त्यांनी लक्षात घ्यावे, असे साहाय्यक पोलीस आयुक्त (प्रशासकीय विभाग) नंदकुमार मिस्त्री म्हणाले. (प्रतिनिधी)
विजयी मिरवणुकांसाठी बंदी नाही!
By admin | Published: May 15, 2014 2:18 AM