- सूर्यकांत वाघमारे, नवी मुंबई नवी मुंबईकरांचा थरकाप उडवणारी घटना सानपाडा येथे घडली. गाडीच्या डिकीतून लटकणारा हात पाहून गाडीतून मृतदेहाची वाहतूक होत असल्याच्या चर्चा रंगल्या आणि बघता बघता पोलिसही कामाला लागले. तीन तासांनी त्या गाडीत जिवंत तरुणाला ठेवून रील्ससाठी 'क्राइम सीन' करण्यासाठी त्यांनी हा प्रकार केल्याचे समोर आले. रील्ससाठी तरुण-तरुणी स्वतः सह इतरांचे जीव धोक्यात घालत असल्याचे प्रकार पाहायला मिळत आहेत.
बदलत्या काळानुसार गरजाही बदलल्या असून, हल्लीच्या तरुणांना लाइक, व्ह्यूज आणि सबस्क्रायबर यांची गरज भासत आहे. बहुतांश तरुणाई जीवन सुखी, समाधानी असो अथवा नसो, सोशल मीडियावर आपलाच बोलबाला झाला पाहिजे यासाठी धडपडताना दिसत आहे. त्याला कारण म्हणजे लाइक, व्ह्यूजमागे मिळणारे चार, पाच पैसे.
रातोरात एखादी रील तुफान व्हायरल होईल आणि आपल्यावर पैशांचा वर्षाव होईल, अशा भ्रमात अनेक खटाटोप केले जात आहेत. काहींच्या सुपीक डोक्यात 'क्राइम सीन' देखील सुचत असल्याने त्यातून सर्वसामान्यांची तर झोप उडत असून पोलिसांचाही ताप वाढला आहे.
पोलिस यंत्रणा लागली कामाला; गुन्हा दाखल
सोमवारी वाशी सानपाडा मार्गावरून धावणाऱ्या एका कारच्या डिक्कीतून हात बाहेर लटकत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आणि पोलिस कामाला लागले. या कारच्या शोधात पोलिसांनी तीन तास घालवल्यानंतर कारच्या डिकीत मृतदेह नव्हे तर रील्स बनवण्यासाठी जिवंत तरुणाला झोपवल्याचे समोर आले.
खात्री पटवण्यासाठी पोलिसांनी त्यांनी रेकॉर्ड केलेले सर्व व्हिडीओ तपासल्यानंतर पोलिसांनी सुटकेचा श्वास घेतला. मात्र, त्यांच्या कृत्याने तणाव निर्माण झाल्याने, पोलिस यंत्रणा कामाला लागल्याने संबंधितांवर गुन्हा दाखल झाला आहे.
असाच प्रकार काही वर्षांपूर्वी मुंबईत घडला होता. गाडीत बसण्यासाठी जागा नसल्याने तरुणांनी एका मित्राला गाडीच्या डिकीत बसवले होते. मात्र, झोपेत त्याचा हात डिकीच्या बाहेर लटकलेला हात पाहून पोलिसांची तारांबळ उडाली होती.
रील्स व्हायरल होण्यासाठी जीव घातला धोक्यात
अमरावतीमध्ये सिग्नलवरच स्त्री-पुरुष रील्ससाठी नाचताना दिसून आले होते. वाहतूककोंडी करून चाललेल्या त्यांच्या नौटंकीवर नागरिकांनी सडकून टीका करताच पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली.
वर्षभरापूर्वी पुणे बंगळुरू मार्गालगत पडीक इमारतीच्या टोकावरून तरुणी लटकताना व्हिडीओ व्हायरल झाला होता. तरुणाच्या हातात हात धरून ही तरुणी रील्ससाठी जीव धोक्यात घालून लटकत होती.
रुळावर झोपून इतरांना आव्हान देण्याचा ट्रेंड
सध्या उत्तर प्रदेशमधील एका तरुणाने रेल्वेखाली रुळावर झोपून इतरांना दिलेल्या आव्हानाचा ट्रेंड सोशल मीडियावर चालला आहे. अशा ट्रेंडच्या नादात सोशल मीडियावर जीवघेणे व अश्लील रील्स बनवले जात आहेत.
याचा परिणाम बालमनावर देखील होत असल्याने मुली सोशल मीडियावरील मैत्रीतून पळून गेल्याचे, गरोदर राहिल्याचे प्रकार घडले आहेत.