मुंबई : आजवर अनेकदा देशात गरिबी हटावची घोषणा झाली, पण गरिबी कधी हटली नाही. मात्र, आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रत्येक योजनेमुळे गरिबांना खरा फायदा मिळतो आहे. गरिबांना गॅस, वीज मिळत आहे. जनधन खात्यांमुळे थेट लाभार्थ्यांच्या खात्यात सबसिडी जमा होते आहे. आज खरी गरिबी हटविण्याची सुरुवात झाली आहे. मोदींच्या काळात खाता येत नाही म्हणूनच सगळे चोर एकत्र आले आहेत, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महागठबंधनच्या प्रयोगावर टीका केली.
भाजपा युवा मोर्चाच्यावतीने चुनाभट्टी येथील सौमैय्या मैदानावर आयोजित सीएम चषक स्पर्धेच्या पारितोषिक वितरण प्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी व्यासपीठावर शिक्षण मंत्री विनोद तावडे, खासदार पूनम महाजन, मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, मंगलप्रभात लोढा, भाजयुमो प्रदेश अध्यक्ष योगेश टिळेकर आदी नेते उपस्थित होते. सीएम चषकाच्या माध्यमातून तब्बल ४२ लाख तरूणतरूणींना इंटरनेटच्या जाळ्यातून बाहेर काढून त्यांना खेळाच्या मैदानावर आणल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी युवा मोर्चाचे अभिनंदन केले. गरिबी हटावच्या घोषणा झाल्या पण गरिबी कधी हटली नाही. मात्र, आता मोदींच्या प्रत्येक योजनेचा फायदा थेट गरिबांना होतो. बँक खाती उघडली, थेट खात्यात अनुदान देण्याचे काम सुरू झाले. त्यामुळे अनुदानात एक पैशाचाही भ्रष्टाचार करता येत नाही. त्यामुळे देशाचे ९५ हजार कोटी रुपये वाचले. आता पैसा खाता येत नाही म्हणूनच महाआघाडीची चर्चा सुरू आहे. मात्र, असे कितीही एकत्र आले तरी पंतप्रधान मोदींना पराभूत करू शकणार नाहीत. आगामी निवडणूक मोदींसाठी नव्हे तर देशाच्या भवितव्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. देशाच्या विकासाचा वेग पुढील दहा वर्षे कायम ठेवायचा असेल तर मोदींना पुन्हा पंतप्रधानपदी निवडून दिले पाहिजे, असे आवाहन फडणवीस यांनी केले.
११ कोटी पेक्षा जास्त युवकांना मुद्रा योजनेचा लाभ मिळाला आहे. कालच्या अर्थसंकल्पात गरीब शेतकऱ्यांना थेट खात्यात मदत देण्याची घोषणा झाली. मजुरांकरता पेन्शन सुरू केली आहे. महाराष्ट्रातही ६९ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीची ५० हजार कोटीची रक्कम थेट खात्यात जमा केली, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
विरोधकांच्या यात्रेला माणसेच मिळत नाहीतयावेळी मुख्यमंत्र्यांनी काँग्रेस, राष्ट्रवादीच्या यात्रांवरही टीका केली. विरोधकांच्या यात्रेला माणसेच मिळत नाहीत. त्यामुळे कॅमेरा फक्त स्टेजवरच ठेवा, अशी मीडियाला विनंती करतात. आमच्या काळात सगळीच कामे झाली असे नाही. मात्र, आम्ही प्रामाणिकपणे कामे केली, असे फडणवीस म्हणाले. यावेळी पूनम महाजन, योगेश टिळेकर यांचीही भाषणे झाली.