मुंबई : रायगड किल्ल्यावर परवानगी नसताना देखील रोप-वेचं काम सुरु असल्यावर रायगड प्राधिकरणाचे अध्यक्ष खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी आक्षेप घेतला होता. आज त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेतली. यावेळी त्यांनी रायगड किल्ल्यावरील कामाबाबत नाराजी व्यक्त केली.
गडावर एखाद बांधकाम करायचं असल्यास त्यासाठी अनेक नाहरकतींची आवश्यकता असते, हा नियम रोप- वे वाल्यांना लागू नाही. रायगड प्राधिकरण माझ्या संकल्पनेतून तयार झाले. रायगड संवर्धनासाठी 606 कोटी रुपये दिले होते. यामध्ये गावांचे रस्ते, सुशोभिकरण, महाड-रायगड रस्त्याचे 147 कोटींचे कंत्राट देण्यात आले. मात्र, दोन वर्षांत आजपर्यंत एक टक्काही काम झालेले नाही. या एमबी पाटील कंत्राटदाराने दुसऱ्या कंत्राटदाराला काम देण्याचे ठरविले. शासनाने त्याला 5 टक्के आगाऊ दिले. आता नव्या कंत्राटदाराला 8 टक्के देण्यात येतील, असा आरोप संभाजी राजे यांनी केला.
रायगड किल्ल्याच्या बाबतीत जे काही गैरप्रकार सुरू आहेत ते मी मुख्यमंत्र्यांच्या कानावर घातले. रोप वे वाल्यांनी कोट्यवधी रुपये कमावल्याचे लक्षात आणून दिले. यावर ठाकरे यांनी रायगडाबाबत चुकीची गोष्ट खपवून घेतली जाणार नाही, गैरकारभार चालणार नाही, अधिकाऱ्यांना समज देण्यात येईल असे आश्वासन दिले आहे.
आक्षेप काय?रायगड प्राधिकरणाच्या बैठकीनंतर अलिबाग येथे जिल्हाधिकारी कार्यालयातील पत्रकार परिषदेत संभाजीराजे म्हणाले की, रायगड किल्ला संवर्धनाच्या कामात खाबूगिरी आणि बाबूगिरीचा शिरकाव झाला आहे. तसेच रायगड प्राधिकरणाच्या माध्यमातून करण्यात येणारी कामं पुरातत्व विभागाकडून रोखली जात असल्याचा आरोप संभाजीराजे यांनी केला आहे. रोप-वे चा मनमानी कारभार असाच चालणार असेल तर आपल्याला वेगळा विचार करावा लागेल, असा इशारा देखील संभाजीराजे यांनी दिला आहे.