पनवेल : ‘देशाच्या संरक्षणासाठी आपण सक्षम झालो आहोत. शत्रू राष्ट्रांना आपल्या ताकदीची जाणीव आहे, त्यामुळे बाहेरच्या शत्रूंची फार चिंता वाटत नाही, परंतु अंतर्गत शत्रूंमुळे देशाला अधिक धोका आहे,’ अशी खंत संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी व्यक्त केली. माजी सैनिकांना ‘वन रँक वन पेन्शन’ योजना लागू करण्यात आली. त्याबद्दल रायगड जिल्हा भाजप माजी सैनिक आघाडीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कृतज्ञता मेळाव्यात पर्रिकर बोलत होते. संरक्षणाकरीता सैन्याबरोबरच शस्त्रांची आवश्यकता असते. शस्त्रनिर्मिती कारखान्याचे उत्पादन १७ ते १८ टक्के वाढविण्यात आले आहे. पुढच्या वर्षी १२ ते १६ तेजस लढाऊ विमाने वायु दलात दाखल होणार आहेत, अशी माहिती पर्रिकर यांनी दिली. ‘बोफोर्समध्ये राजीव गांधी पंतप्रधान असताना घोटाळा झाला. या तोफा चांगल्या दर्जाच्या होत्या,’ असेही त्यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२१ पर्यंत देशातील प्रत्येक नागरिकाला हक्काचा निवारा मिळावा असा संकल्प केला आहे. त्यानुसार प्रत्येक सैनिकांला पोस्टींगच्या ठिकाणी घर देण्याचे माझे स्वप्न आहे, असे सरंक्षण मंत्र्यांनी सांगितले. पठाण कोट हल्ल्याचा निषेध नोंदवत मनोहर पर्रिकर यांनी या हल्ल्याचा योग्य वेळी बदला घेण्याचा इशारा दिला. पनवेल परिसरात मोठ्या प्रमाणात माजी सैनिक राहतात. त्यांना सिडकोने माफत दरात घरे उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी अध्यक्षीय भाषणात केली. आमदार प्रशांत ठाकूर यांनी वन रँक वन पेन्शन’ योजना लागू केल्याबद्दल सरंक्षण मंत्र्यांचे आभार मानले. माजी सैनिकांना समाजात जो आदर आहे तसाच सन्मान त्यांच्या कुटुंबियांना मिळणे आवश्यकता असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. (प्रतिनिधी)सेफ्टी झोनबाबत निवेदनउरण येथील सेफ्टी झोनमध्ये एकूण सहा हजार घरांचा प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून कायम आहे. याबाबत उरणचे नगराध्यक्ष महेश बालदी यांच्या नेतृत्वाखाली सरंक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांना निवेदन देण्यात आले. देशात बहुतेक ठिकाणी हा प्रश्न प्रलंबीत आहे. तो लवकरात लवकर मार्गी लावण्यात येईल असे आश्वासन पर्रिकर यांनी दिले.
बाहेरच्या नव्हे, अंतर्गत शत्रूंची चिंता
By admin | Published: April 15, 2016 2:37 AM