लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधीच्या लॉकडाऊननंतर ‘पुनश्च हरिओम’ म्हणत निर्बंध शिथिल करण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, ही शिथिलता आल्यानंतर पहिल्या महिन्याभरात जेमतेम १० टक्के लोक हॉटेलांमध्ये तर, २१ टक्के लोकच मॉलमध्ये शॉपिंगसाठी जातील. मात्र, सर्वाधिक ३२ टक्के लोक हे विविध ठिकाणची प्रार्थनास्थळे उघडण्याच्या प्रतीक्षेत असल्याची माहिती नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणातून समोर आली आहे.
देशासह महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असला तरी अर्थचक्र पुन्हा रुळावर आणण्यासाठी सरकारने निर्बंध शिथिल करण्यास सुरुवात केली आहे.
त्या पार्श्वभूमीवर ‘लोकल सर्कल’ या संस्थेने देशातील २५४ जिल्ह्यांतील ३२ हजार लोकांचे एक आॅनलाइन सर्वेक्षण केले आहे. त्यात हॉटेल, मॉल आणि प्रार्थनास्थळांत प्रवेश सुरू झाल्यानंतर पहिल्या महिन्याभरात तुम्ही तिथे जाल का, असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्याआधारे वरील निष्कर्ष काढण्यात आला आहे. कोरोनाच्या दहशतीमुळे हॉटेल आणि मॉलमध्ये जाणाऱ्यांचे प्रमाण वाढणार नाही, असे हाअहवाल सांगतो. त्यामुळे तिथल्या व्यवसायिकांसमोरील आव्हाने आणखी काही काळ कायम असतील, असेच भाकीत वर्तविण्यात आले आहे. सर्वेक्षणात सहभागी झालेले ६६ टक्के पुरुष तर ३४ टक्के महिलांचा समावेश होता.
भगवंताच्या चरणी धाव साहजिक!दोन महिन्यांत मानवी जीवन सर्वार्थाने उद्ध्वस्त झाले आहे. आपल्यापेक्षा समोरच्याचे दु:ख कैकपटीने जास्त आहे हे बघून प्रत्येकाची सहनशीलता वाढत आहे. लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय होत असला तरी आरोग्य आणि आर्थिक आघाड्यांवरील धोका संपलेला नाही. अशा अवस्थेत मन:शांती आणि संकटाचा मुकाबला करण्यास बळ मिळावे या याचनेसाठी भगवंताच्या चरणी धाव घेण्याची भावना साहजिक आहे. - डॉ. संजय कुमावत, मानसोपचार तज्ज्ञ