कोल्हापूर: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी संयुक्त पुरोगामी आघाडीचं (यूपीए) नेतृत्त्व करावं अशी भूमिका शिवसेना खासदार संजय राऊत सातत्यानं मांडत आहेत. याबद्दल काँग्रेस नेते नाराजी व्यक्त करत आहेत. राऊतांवर निशाणा साधत आहेत. आता या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी भूमिका स्पष्ट केली आहे. कोल्हापुरात पत्रकारांशी संवाद साधत असताना पवारांनी यूपीएच्या अध्यक्षपदाबद्दल महत्त्वाचं विधान केलं.
यूपीएच्या अध्यक्षपदात मला अजिबात रस नाही. मी त्यात पडणार नाही. ती जबाबदारी मी घेणार नाही, असं शरद पवार यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं. विरोधकांनी एकत्र यायला हवं असं मला वाटतं. मात्र तसं होत असताना वास्तवाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, असं शरद पवार म्हणाले.
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी सर्वोच्च नेत्या आहेत. त्यांच्या पक्षाचे २०० हून अधिक आमदार आहेत. राज्याचं नेतृत्त्व त्या सक्षमपणे करत आहेत. राज्यात उत्तम वर्चस्व असलेले पक्ष देशात आहेत. प्रादेशिक राजकारणात त्यांची ताकद आहे. पण काँग्रेस संपूर्ण देशात आहे याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. प्रत्येक ठिकाणी काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत. काँग्रेसचं अस्तित्व देशभरात आहे. त्यामुळे त्यांना सोबत घेऊन वास्तवदर्शी पर्याय समोर ठेवावा लागेल. त्यातून काहीतरी निर्माण होऊ शकेल, असं पवार म्हणाले.
शिवसेना खासदार संजय राऊत सातत्यानं तुमच्या नावाचा आग्रह यूपीएच्या अध्यक्षपदासाठी धरत आहेत, याची आठवण पत्रकारांनी पवारांना करून दिली. त्यावर ते राऊत यांचं मत आहे. माझं मत तसं नाही. जनाधार असलेल्या पक्षांनी एकत्र येऊन पर्याय द्यायला हवा. तसं झाल्यास काहीतरी सकारात्मक घडेल. तहहृयात अध्यक्षपदी राहणारे पुतीन तयार होऊ नयेत अशी आपली इच्छा असल्याचं पवार यांनी म्हटलं.