लोकमत न्यूज नेटवर्कमुुंबई : राज्यभरातून मुंबईत राज्य परिवहन महामंडळाच्या बससह चालक-वाहकांना प्रवाशांच्या वाहतुकीच्या सेवेसाठी पाठविले जात आहे. मात्र, कोरोनाची भीती व अन्य कारणांमुळे दांड्या मारणाऱ्या आतापर्यंत ३०० चालक-वाहकांना महागात पडले. यापैकी काही कर्मचाऱ्यांचे निलंबन तर काही जणांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.एसटीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, मुंबईत लोकल सुरू असली तरी काही निकषांमुळे प्रवाशांची गैरसोय होत होती. परिणामी, बेस्टची वाहतूक सेवा अपुरी पडत असल्याने बेस्ट व परिवहन महामंडळात करार झाला असून, त्यानुसार राज्यातील अनेक बससह चालक-वाहक उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
नाशिक, अहमदनगर, सांगली, सोलापूर आदी जिल्ह्यांतील कर्मचाऱ्यांना मुंबईत पाठविले आहे. मात्र कोरोनाचे कारण देत अनेक वाहक, चालक कामावर येण्यास टाळाटाळ करतात. त्यांच्यावर निलंबन आणि कारवाई करण्यात आली. दरम्यान, नाशिक जिल्ह्यातूनही प्रत्येक आगारातून दहा दिवसांसाठी ४० ते ४५ जणांची टीम आलटूनपालटून मुंबईला ड्युटीसाठी पाठविली जाते. मात्र कोरोनाची भीती व अन्य कारणांमुळे दांड्या मारणाऱ्या आतापर्यंत १०० हून अधिक जणांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.