पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या निर्णयामुळे ऐन लग्नसराईच्या मुहूर्तावर सोने आणि चांदीला झळाळी आल्याची प्रतिक्रिया मुंबई ज्वेलर्स असोसिएशनचे प्रवक्ते कुमार जैन यांनी व्यक्त केली. सर्वात सुरक्षित आणि सोपी गुंतवणूक म्हणून सोने, चांदी आणि दागिन्यांकडे पाहिले जाते. त्यामुळे आज सोने बाजारात मोठी वाढ झाल्याचे ते म्हणाले.
जैन यांनी सांगितले की, राज्यात तुळशी विवाहानंतर लग्नाचे मुहूर्त सुरू होतात. त्यामुळे सोने खरेदीसाठी सराफा बाजारात मोठी झुंबड उडते. त्यात दसरा आणि लक्ष्मीपूजनाला सोन्याचा दर ३० हजारांहून अधिक असल्याने भाव घसरण्याची वाट ग्राहक पाहत होते. मात्र आश्चर्यकारक निर्णयामुळे मोठ्या प्रमाणात सराफा बाजारात गुंतवणूक वाढल्याने परिणामी सोन्याचा भाव वधारला.
सोने-चांदी दागिन्यांच्या बड्या व्यवहारात पॅनकार्ड सक्तीचे असल्याने या सर्व व्यवहारांची नोंद सरकार दरबारी होणार आहे. परिणामी सरकारचा महसूल वाढणार असून सराफा बाजारालाही ‘अच्छे दिन’ येण्याची शक्यता आहे. मात्र त्याचा फटका विवाहप्रसंगी खरेदीसाठी थांबलेल्या ग्राहकांना बसणार आहे.