- स.सो. खंडाळकर, औरंगाबाद
मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान भरपाईसाठी पंचनामे होणार नसले तरी नमुना सर्वेक्षण केले जाणार आहे. त्यानुसार त्याचे काम सुरू झाले आहे. तशी घोषणाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती.यासंदर्भात विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट यांनी सांगितले की, प्रत्येक शेतकऱ्याच्या वैयक्तिक नुकसानीचे पंचनामे होणार नाहीत; परंतु विमा कंपनीचे अधिकारी, महसूल अधिकारी व कृषी अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने नमुना सर्वेक्षण करण्यात येईल व नुकसानीचा अंदाज घेतला जाईल. या सर्वेक्षणानंतर प्रमाण उत्पन्न, उंबरठा उत्पन्न व प्रत्यक्ष उत्पन्नही पाहिले जाईल. पीक कापणी प्रयोगावरून किती नुकसान झाले हे ठरवले जाईल. विम्याचा प्रीमियम छोटा आहे; पण त्यात पिकांना संरक्षण दिले पाहिजे, ही सक्ती आहे. त्यानुसार लवकरात लवकर प्रक्रिया पूर्ण केली जाईल, असे दांगट म्हणाले.अतिवृष्टीमुळे ८३ जणांचा मृत्यू- जूनपासून मराठवाड्यातील झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. चार महिन्यांत तब्बल ८३ नागरिकांचा मृत्यू झाला. औरंगाबादेत ७, नांदेड जिल्ह्यात २२, जालना जिल्ह्यात ७, बीड जिल्ह्यात १७, परभणी जिल्ह्यात ८, लातूर जिल्ह्यात ८, हिंगोली जिल्ह्यात ९ व उस्मानाबाद जिल्ह्यात ५ अशी ही मृत्युसंख्या आहे. तर, शेतकऱ्यांसाठी उत्पन्नाचे साधन तसेच शेतीसाठी मोठी गुंतवणूक असलेली तब्बल ७३२ लहान-मोठी जनावरे या नैसर्गिक आपत्तीत दगावली आहेत. सर्व नुकसानीचीही नियमानुसार भरपाई मिळणारच आहे; परंतु अलीकडच्या अतिवृष्टीमुळे लाखो हेक्टर जमिनीतील झालेले नुकसान महत्त्वाचे आहे. त्याची योग्य व त्वरित नुकसानभरपाई सरकारी यंत्रणेने घाई केली पाहिजे अन्यथा जनक्षोभ वाढून आंदोलने होणारच नाहीत, हे सांगता येत नाही.