"...हा मोदींचा चमत्कार नाही तर काय आहे?" अजित पवारांनी केली पंतप्रधानांची तारीफ, EVM चंही केलं समर्थन
By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2023 12:33 AM2023-04-09T00:33:21+5:302023-04-09T00:37:07+5:30
कुणीही एक व्यक्ती ईव्हीएममध्ये गडबड करू शकत नाही. ही एक मोठी यंत्रणा आहे...
मला ईव्हीएमवर पूर्ण विश्वास आहे. कुणीही एक व्यक्ती ईव्हीएममध्ये गडबड करू शकत नाही. ही एक मोठी यंत्रणा आहे. पराभूत होणारा पक्ष ईव्हीएमला दोषी ठरवतो. मात्र हा जनतेचा जनादेश आहे, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार अजित पवार यांनी निवडणुकीत ईव्हीएमच्या वापराचे समर्थन केले आहे. याच वेळी त्यांनी पंतप्रधानांच्या कामकाजाचीही प्रशंसा केली. ते पत्रकारांशी बोलत होते.
शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मुखपत्र असलेल्या सामनामध्ये इव्हीएमच्या बाबतीत बातमी देण्यात आली आहे की, बांगलादेशमध्ये पुन्हा बॅलेटवर शिफ्ट होण्याचा निर्मय झाला आहे. आपल्याला असं वाटतं का? असे विचारले असता अजित पवार म्हणाले, "माझा वैयक्तिकरित्या ईव्हीएमवर पूर्ण विश्वास आहे. ईव्हीएममध्ये बिघाड असता तर छत्तीसगड, पश्चिम बंगाल, राजस्थान, पंजाब, केरळ, तामिळनाडू, तेलंगणा, आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये विरोधी पक्षांचे सरकार नसते."
पवार म्हणाले, "ईव्हीएममध्ये फेरफार करणे एका व्यक्तीला शक्य नाही कारण ही एक मोठी यंत्रणा आहे. ईव्हीएममध्ये छेडछाड झाल्याचे सिद्ध झाले, तर संपूर्ण देशात पेटून उठेल. यामुळे, असे करण्याचे धाडस कुणी करेल असे मला तरी वाटत नाही. कधी-कधी काही लोक निवडणूक हरतात, पण आपण हरूच शकत नाही, असे त्यांना वाटते आणि मग ते ईव्हीएमला दोष देऊ लागतात आणि त्यातून सुटका करून घेतात, पण हाच खरा जनतेचा जनादेश आहे."
पंतप्रधानांच्या डिग्रीवर काय म्हणाले पवार? -
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिग्रीसंदर्भात आणि सावरकरांच्या मुद्द्यांवर विचारले असता अजित पवार म्हणाले, एके काळी केवळ दोन खासदार असलेल्या पक्षाने 2014 मध्ये पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली पूर्ण बहुमत मिळवत सरकार स्थापन केले आणि तो सर्वदूरपर्यंत पोहोचला हा मोदींचा करिष्मा आहे की नाही? त्यांच्या विरोधात विविध प्रकारची वक्तव्ये केली जातात. पण ते आणखी लोकप्रिय झाले आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली भाजपने अनेक राज्यांत निवडणुका जिंकल्या. आता 9 वर्षांनंतर हे मुद्दे काढून काय उपयोग? त्यांचे कामकाज जनतेने पाहिले आहे आणि राजकीय क्षेत्रात शिक्षणाचा मुद्दा हा तसे पाहिले तर गौन समजला जातो.
कारण आम्ही पाहिले आहे की या राज्याचे चारवेळा मुख्यमंत्री झालेले वसंत दादा पाटील यांचेही शिक्षण अतिशय कमी झालेले होते. तरीही अत्यंत उत्तम प्रशासक आणि लोकाभिमुख कारभार म्हणून त्यांची ओळख भारताला होती. त्याच प्रमाणे आपल्या राज्यालाही आहे. त्यांची कारकिर्द महाराष्ट्र विसरलेला नाही. उलट त्यंच्याच कारकिर्दित सर्वात जास्त महाविद्यालये महाविद्यालये उघडण्यात आली. म्हणूनच राजकारणात शिक्षित असण्याची अट नाही. त्यामुळे या प्रकरणी माझी भूमिका स्पष्ट आहे.