ऑनलाइन लोकमत
जळगाव, दि. 12 - मी सत्तेशी बांधिल नाही. माझी बांधिलकी शेतकरी, जनतेशी आहे असे उद्धव ठाकरे यांनी धरणगाव येथील सभेत बोलताना सांगितले. शिवसेना ज्या सरकारमध्ये सहभागी आहे त्या सरकारने कर्जमाफीची घोषणा केली ही चांगली बाब आहे पण प्रत्यक्षात कर्जमाफीची अंमलबजावणी सुरु झाली की नाही हे पाहण माझी जबाबदारी आहे असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. शिवसेनेने सरकारला शेतक-यांपुढे झुकायला लावलं असे उद्धव ठाकरे म्हणाले.
उद्धव ठाकरे आज खान्देशच्या दौ-यावर आहेत. सर्वप्रथम पाळधी येथे त्यांनी शेतक-यांशी संवाद साधला. राज्य शासनाने कर्जमाफीची घोषणा केली मात्र अद्याप शेतक-यांना लाभ मिळालेला नाही. जोपर्यंत लाभ मिळत नाही व शेतक-यांचा सातबारा कोरा होत नाही, तोपर्यंत आपला लढा सुरुच राहणार असल्याचे शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी बुधवारी जळगाव पाळधी येथे शेतक-यांशी संवाद साधताना सांगितले.
कर्जमुक्तीची यादी विधानसभेत मागणार - उद्धव ठाकरे
कर्जमुक्तीची मर्यादा २०१६ नव्हे तर २०१७ करण्यात यावी, तसेच कर्जमुक्तीची यादी विधानसभेत मागण्यात येईल, ही यादी घरोघरी जावून तपासण्यात येईल, असे प्रतिपादन उद्धव ठाकरे यांनी शेतकरी संवाद सभेत केले.
ठाकरे यांच्यासोबत परिवहन मंत्री दिवाकर रावते, रामदास कदम व सहकार राज्यमंत्री गुलाबराव टील उपस्थित होते. जळगाव विमानतळावर उध्दव ठाकरे यांचे स्वागत माजी मंत्री सुरेशदादा जैन यांनी केले. यावेळी ठाकरे यांनी सुरेशदादा यांच्या तब्येतीची विचारणा केली. त्यानंतर ते पाळधीकडे रवाना झाले. पाळधीत त्यांनी गुलाबराव पाटील यांच्या कार्याचे कौतुक करीत एक चांगला शिवसैनिक दिल्याबद्दल पाळधीकरांचे आभार मानले. यावेळी उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांना दाद दिली. अवघे तीन मिनिटे त्यांनी संवाद साधला व ते धरणगाव येथे होणा-या सभेसाठी रवाना झाले.
आणखी वाचा
दरम्यान अमरनाथ यात्रेकरुंच्या बसवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यावरुन उद्धव ठाकरे यांनी आजच्या सामनाच्या अग्रलेखातून नरेंद्र मोदींवर सडेतोड टीका केली.अतिरेकी व पाकडय़ांना कडक संदेश द्यायचा असेल तर पुढच्या आठ दिवसांत ३७० कलम हटवून कश्मीर हिंदुस्थानचाच अविभाज्य भाग असल्याचे जगाला दाखवून द्या. वीरश्रीयुक्त भाषणे व धमक्यांनी जनतेचे कान विटले आहेत. देशाला ‘ऍक्शन’ हवी आहे व त्यासाठी पंतप्रधानांच्या अंगात हिटलरचा संचार झाला तरी चालेल असं उद्धव ठाकरे बोलले आहेत.