रत्नागिरी : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात आज मतदान सुरू असतानच शिवसेना नेते किरण सामंत हे नॉट रिचेबल झाल्याने खळबळ उडाली होती. मात्र, अखेर किरण सामंत हे समोर आले असून त्यांनी पाली या आपल्या मूळगावी मतदानाचा हक्कही बजावला. तसेच, आपल्या सीम कार्डच्या प्रॉब्लेममुळे आपण नॉट रिचेबल होतो, पण आपले ड्रायव्हर आणि बॉडीगार्ड हे कार्यकर्त्यांच्या संपर्कात असल्याची प्रतिक्रिया किरण सामंत यांनी दिली. दरम्यान, किरण सामंत हे सकाळपासून नॉट रिचेबल होते, त्यामुळे शिवसैनिकांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला होता.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघामध्ये यंदा चुरशीची निवडणूक होत असून भाजपकडून नारायण राणे आणि शिवसेना ठाकरे गटाकडून विनायक राऊत यांच्यात लढत होत आहे. दरम्यान, आज सकाळी मतदानाला सुरुवात होताच किरण सामंत हे नॉट रिचेबल झाल्याचे वृत्त धडकताच महायुतीमध्ये खळबळ उडाली आहे. यांच्याशी संपर्क होत नव्हता. त्यामुळे शिवसेनेचे कार्यकर्ते सुद्धा संभ्रमात असल्याचे दिसून आले. तर दुसरीकडे ठाकरे गटाचे उमेदवार विनायक राऊत यांनी किरण सामंत यांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, मतदान संपण्यापूर्वी फक्त 15 मिनिटे आधी किरण सामंत हे आपल्या पाली या मूळ गावी मतदानासाठी आले. याठिकाणी त्यांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी किरण सामंत म्हणाले की, "सोमवारी रात्री आपण 12 वाजेपर्यंत निवडणुकीचं काम करत होतो. मंगळवारी सकाळी 8 वाजता प्रचारासाठी बाहेर पडलो. पण मोबाईलमधील सिम कार्डच्या प्रॉब्लेममुळे आपण नॉट रिचेबल होतो. पण माझ्या ड्रायव्हरचे आणि बॉडीगार्डचे मोबाईल सुरू असल्याने त्या माध्यमातून कार्यकर्त्यांच्या संपर्कात होतो."
किरण सामंत यांना पोलीस संरक्षण द्यावं, वैभव नाईकांची मागणीठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी किरन सामंतांच्या नॉट रिचेबल वृत्तावर प्रतिक्रिया दिली होती. ते म्हणाले की, किरण सामंत हे कालपासून नॉट रिचेबल आहेत. आज आम्ही पोलीस महासंचालकांना पत्र देऊन किरण सामंत यांना निवडणुकीनंतर ताबडतोब संरक्षण देण्यात यावं, अशी मागणी केली आहे. या आधी या मतदारसंघात दहशतवादाच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे मतदान शांततेत झाल्यानंतरसुद्धा काही होऊ नये, यासाठी पोलिसांनी किरण सामंत यांना लवकरात लवकर पोलीस संरक्षण द्यावं, असे वैभव नाईक यांनी म्हटले आहे.