- विश्वास पाटील, कोल्हापूरशेतीपंपाचे कनेक्शन मुदतीत (सहा आठवडे) न दिल्याबद्दल महावितरण कंपनीस आठवड्यास शंभर रुपये प्रमाणे २२,३०० रुपये दंड ठोठावला आहे. ‘महावितरण’च्याच ग्राहक संरक्षण फोरमने कृती मानके नियमन कायदा २०१४ च्या कलम आठनुसार हा दंड ठोठावला असून तो महिन्याच्या आत शेतकऱ्याला द्यावा, असे आदेश दिले आहेत. त्या शेतकऱ्याने सन १९९३ ला शेतीपंपाच्या कनेक्शनसाठी १९१० रुपये अनामत रक्कम भरली होती, ती ‘महावितरण’ने २०१५ ला परत केली. त्यामुळे या बारा वर्षांच्या कालावधीतील अनामत रकमेचे व्याजही द्यावे, असेही फोरमने म्हटले आहे.‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर शेतकऱ्याला तातडीने वीज कनेक्शन तर मिळालेच शिवाय आता अनामत रकमेचे व्याज व आणि विलंबाबद्दल दंडही मिळणार आहे. सातारा जिल्ह्यातील करंदी (ता. जावळी) येथील सदाशिव दिनकर निकम यांनी शेतीपंपाच्या कनेक्शनसाठी सन १९९३ ला अर्ज करून अनामत भरली; परंतु तब्बल २२ वर्षे हेलपाटे मारणाऱ्या निकम यांची फरफट ‘लोकमत’ने गतवर्षी १२ जूनच्या अंकात प्रसिद्ध केल्यावर ‘महावितरण’ची यंत्रणा हादरली व अवघ्या १८ दिवसांत त्यांना वीज कनेक्शन जोडून दिले. ‘लोकमत’चे वृत्त वाचून कोल्हापुरातील व्यवसायाने टेक्सटाईल इंजिनिअर असलेले सोमेश्वर रामचंद्र शिंगे यांनी निकम कुटुंबीयांची भेट घेत महावितरणच्या सातारा कार्यालयाकडे तक्रार केली. हा कालावधी ४ वर्षे ५ महिने होता. त्यातील सहा आठवडे वगळता २२३ आठवड्यांचे प्रति आठवडा २२ हजार ३०० रुपये दंड देण्याचा निकाल फोरमने दिला.
कनेक्शन न दिल्याबद्दल महावितरणला २२,३०० रुपये दंड
By admin | Published: February 07, 2016 1:06 AM