मुंबई : मेट्रो रेल्वे व त्याचे कारशेड याबाबत आपल्या भूमिकेचा पुनरुच्चार करतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आपल्यात खरंच सुसंवाद असून ही अफवा समजू नका, असा टोला महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्र्यांना गुरुवारी लगावला. खडसेंच्या वक्तव्यानंतर फडणवीस यांनी ‘अशा अफवांवर विश्वास ठेऊ नका’, असे टिष्ट्वट केले होते. यातील ‘अफवा’ या शब्दाने खडसे चांगलेच दुखावल्याचे दिसून आले. खडसे म्हणाले की, दोन कोटी मुंबईकरांना मेट्रोसेवा मिळाली पाहिजे याकरिता आजही मी त्यांच्या बाजूला आहे व उद्याही राहणार आहे. मेट्रो कारशेडकरिता अन्य पर्यायी जागा मिळाली नाही तर आरे कॉलनीत कारशेड उभी करावी लागेल. मात्र याबाबतच्या समितीचा अहवाल अजून आलेला नाही व त्या निर्णयाचे सर्वाधिकार आपल्याला अजून मिळालेले नाहीत. मेट्रो कारशेडकरिता ३० हेक्टर जमीन देण्याचा निर्णय मागील सरकारच्या काळात ५ मार्च २०१४ रोजी झाला. मात्र प्रत्यक्ष जमिनीचा ताबा दुग्धविकास मंत्रालयाने एमएमआरडीएला दिलेला नाही. कारशेडकरिता अन्य जागा नाही हे आपले वैयक्तिक मत नव्हते तर एमएमआरडीएचे मत होते. सध्या पर्यायी जागेकरिता तज्ज्ञांची समिती आपणच नेमली असून त्यांचा अहवाल अपेक्षित आहे. मात्र आरे कॉलनीमधील जागा उपलब्ध करून द्यायची नसेल तर मुंबई पोर्ट ट्रस्ट अथवा खाजण जमीन देण्याचा पर्याय सुचवला जात आहे. मात्र त्यास सीआरझेडचा मोठा अडसर आहे. त्या पार्श्वभमीवर आपण मेट्रो प्रकल्पाची सेवा दोन कोटी मुंबईकरांना मिळावी या हेतूने वक्तव्य केले होते, असे ते म्हणाले. (विशेष प्रतिनिधी)
...सुसंवाद ही अफवा नव्हे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2015 3:55 AM