नागपूरः शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या महाविकास आघाडीचं पहिलंच अधिवेशन नागपुरात सुरू आहे. या अधिवेशनात भाजपा आणि शिवसेनेमध्ये चांगलीच खडाजंगी झालेली पाहायला मिळत आहे. या अधिवेशनासाठी दोन दिवसांपूर्वीच शरद पवार दाखल झाले, त्यांच्या पाठोपाठ एकनाथ खडसेही पोहोचले. त्यानंतर आता नारायण राणेसुद्धा दाखल झाले आहेत. राणे नागपुरात आले असता पत्रकारांनी त्यांना घेरलं आणि काही प्रश्न विचारले. राणेंना ठाकरे सरकारबद्दल विचारले असता त्यांनी आक्षेप नोंदवला आहे. राणेंनी 'ठाकरे सरकार' या शब्दप्रयोग करू नका, असा सल्लाच पत्रकारांना दिला आहे.'हे महाराष्ट्र सरकारचं अधिवेशन आहे. कोणाचं नाव त्याला जोडू नका,' अशी सूचना त्यांनी उपस्थित पत्रकारांना केली आहे. तसेच हे अधिवशेन असल्याचं वाटतच नाही. सगळं कसं घरगुती वाटतंय. सत्ताधाऱ्यांकडून कुठलीही गोष्ट नियमाला धरून होत नाही आहे, अशी टीकाही राणेंनी केली आहे. सरकारच्या कामगिरीबद्दल विचारले असता, राणेंनी माहिती घेऊन बोलेन, असं सांगितलं. नारायण राणे आज पत्रकार परिषद घेऊन असून, ते काय बोलतात याबाबत उत्कंठा आहे. तत्पूर्वी नितेश राणेंनीही उद्धव ठाकरेंवर टीका केली होती. आमदार नितेश यांनीही काल उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. उद्धव ठाकरे हे सभागृहात मातोश्रीवर असल्यासारखे भाषण करत होते. त्यामुळे शिवसेना आणि मित्र पक्षांचं पुढील विधिमंडळ अधिवेशन त्यांनी मातोश्रीवर बोलवावं. त्यांचे एकंदर भाषण हे प्रवचनी अंदाजातलं होतं. प्रवचनं ही कानाला ऐकायला बरी वाटतात. मात्र, त्यातून प्रश्नांचं समाधान होत नसल्याचं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
'ठाकरे' सरकार नव्हे, तर महाराष्ट्र सरकार म्हणा- नारायण राणे
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2019 1:08 PM