पुणे : हे सरकार नको, हा मंत्री काम करीत नाही असे दोष देणे सद्यस्थितीला योग्य नाही. आत्ताची वेळ कोणाचे मूल्यमापन करण्याची नाही, पण ज्या काही कमतरता आहेत त्या आम्ही राज्य सरकारच्या निदर्शनास आणून देत आहोत, असे माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. कोरोना आपत्तीत शासकीय यंत्रणेत समन्वय असणे जरूरी असून, हा समन्वय साधण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी यात लक्ष घालावे अन्यथा कोरोनाच्या लढाईत आपण मागे पडू असेही ते यावेळी म्हणाले.
राज्यातील मंत्र्या-मंत्र्यामध्ये समन्वय नसून, सत्तेतील तीन पक्षांमध्ये तथा मंत्री मंडळ व प्रशासन यांच्यामध्ये समन्वयाचा अभाव आहे. असे सांगून फडणवीस यांनी, हा समन्वय घडवून आणणे ही राज्याच्या प्रमुखांची जबाबदारी असून त्यांनी ती पार पाडावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. प्रशासन व शासन यांच्यात योग्य समन्वय घडला नाही तर, समन्वयाअभावी कोरोनाशी आपली जी लढाई सुरू आहे ती मागे जाईल. ज्याला जे मनात येईल तसा तो निर्णय घेत गेला तर कोरोना विरोधातील ही लढाई चालू शकत नसल्याचे ते म्हणाले.
सद्यस्थितीला कुठल्याही राजकीय समीकरणाचा आम्ही विचार करीत नाही. सरकार बदलणे, सरकार पाडणे हा आमचा अंजेडा देखील नाही. परंतु, हे सरकार कसे चालते हे मी सांगण्याची आवश्यकता नाही. किंबहुना त्यामुळे त्याच्या करिता आम्हाला दिर्घकाळ प्रयत्न करावे लागतील असेही मला वाटत नाही. आज या विषयावर चर्चा करणे योग्य नसून, लोकांना सुध्दा ही चर्चा नको आहे. आपण सर्व मिळून कोरोनाशी लढाई कशी करतो याच्याबद्दल लोकांना जास्त रस असल्याचे फडणवीस यांनी सांगून, राज्य शासनावरील टीका टाळली.
दोन वर्षापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसची भाजपसोबत येण्याची इच्छा होती. त्यासंबंधी चर्चाही झाल्या होत्या. परंतु,आमच्या सर्वोच्च नेत्यांनी शिवसेना सोडून आपल्याला त्यांच्यासोबत जाता येणार नाही असे सांगितले होते. त्यामुळे बरेच पुढे गेलेले हे प्रकरण थंड पडले असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले. दरम्यान या सर्व राजकीय घडामोंडीबाबत मीच आता पुस्तक लिहिणार आहे. त्यामुळे सर्व गुपिते आताच सांगितली तर माझ्या पुस्तकाला मागणी राहणार नाही असे सांगून या प्रकरणी अधिक भाष्य करण्याचे टाळले.
-----------------
डॉक्टर व वैद्यकीय सेवकांना प्राधान्य हवेच
पुण्यातील व्हीव्हीआयपी गेस्ट हाऊस डॉक्टरांना उपलब्ध करून दिल्याबद्दल पालकमंत्री अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली होती. यावर बोलताना फडणवीस यांनी, कोरोना लढाईत अग्रभागी असलेल्या डॉक्टर व अन्य वैद्यकीय सेवकांना सोयीसुविधांमध्ये प्राधान्य देणे जरूरी असल्याचे सांगितले. जर व्हीआयपी गेस्ट हाऊस त्यांना देता येत नसेल तर अन्य ठिकाणी त्यांची व्यवस्था करावी असे सांगून, त्यांनी असे आताच्या काळात कोण व्हीआयपी या गेस्ट हाऊसमध्ये येणार असा प्रश्नही उपस्थित केला.
--------------------------