पु.भा. भावे साहित्यनगरी (डोंबिवली) : पूर्वाध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी सूत्रे सोपवताना ‘सूत्रे नाही, सत्य सोपवत आहे’ असे सांगितले होते. याक डे मी अंतर्मुख होऊन विचार करतो आहे. हे सत्य पचवण्याची क्षमता आपल्या व्यक्तिमत्त्वात आहे की नाही, यावर विचार करतो आहे. सत्यासाठी येशू ख्रिस्ताला सुळावर चढावे लागले. दाभोलकर, पानसरे, कलबुर्गींनाही यातना सहन कराव्या लागल्या. त्यामुळे मी सत्याकडे अंतर्मुख होऊन पाहत आहे. सत्य नाही, सूत्रेच स्वीकारतो आहे, असे प्रतिपादन संमेलनाध्यक्ष डॉ. अक्षयकुमार काळे यांनी व्यक्त केले. साहित्य संमेलनाच्या समारोप समारंभात डॉ. काळे बोलत होते. ते म्हणाले, मी बुद्ध, चार्वाक, म. फुले, डॉ. आंबेडकर नाही. या महापुरुषांचा अभ्यासक आहे. मी प्राध्यापक आहे, प्रामाणिकपणे शिकवले आहे. प्राध्यापकाचे सात्त्विकीकरण होत नाही, तोपर्यंत महापुरुष शिकवता येत नाही.डॉ. काळे यांनी संमेलनाचे आयोजन करणाऱ्या आगरी युथ फोरमचे अभिनंदन करणारा अध्यक्षीय ठराव मांडून आपल्या भाषणाला सुरुवात केली. डोंबिवलीकरांनी केलेल्या आदरातिथ्याबद्दलही त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. संमेलनात झालेल्या वेगवेगळ्या कार्यक्रमांचा आढावा त्यांनी घेतला. ते म्हणाले, सभागृहात जेवढी चर्चा होते, तेवढीच चर्चा सभागृहाबाहेर होत असते. ती चर्चा वाङ्मयीन वातावरण सुदृढ करणारी असते. मी काव्यसमीक्षक आणि त्याहीपेक्षा काव्यरसिक आहे. कविता माझ्या आंतरिक सुखदु:खाचे वहन आहे. त्यामुळे तमाम कवींविषयी, त्यांच्या कवितांविषयी कृतज्ञता व्यक्त करतो, असेही ते म्हणाले.अ.भा. मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद जोशी म्हणाले, वेगवेगळे ट्रेण्ड सेट करणारे, हे संमेलन आहे. या व्यासपीठावर आजवर अनेक राजकीय नेते आले असून हे संमेलन राजकीय मनोमिलन घडवणारे असल्याचे त्यांनी नमूद केले. (प्रतिनिधी)
सत्य नाही, सूत्रेच स्वीकारतो
By admin | Published: February 06, 2017 2:40 AM