उद्धव ठाकरे नाही, नाना पटोले मुख्यमंत्री होणार? दाव्यावर काँग्रेस नेत्यांच्या प्रतिक्रिया यायला लागल्या
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2024 11:50 AM2024-09-23T11:50:29+5:302024-09-23T11:50:51+5:30
आता मविआत नाही तर काँग्रेसमध्येच सारवासारव सुरु झाली आहे. यावर नाना पटोले, बाळासाहेब थोरात, रमेश चेन्नीखला यांची प्रतिक्रिया आली आहे.
विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेसचाच मुख्यमंत्री होणार असून नाना पटोले हे मुख्यमंत्री होतील असे विधान रविवारी नागपुरात करण्यात आले होते. यानंतर आता मविआत नाही तर काँग्रेसमध्येच सारवासारव सुरु झाली आहे. यावर नाना पटोले, बाळासाहेब थोरात, रमेश चेन्नीखला यांची प्रतिक्रिया आली आहे.
प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांना नेत्यांना असे वाटते की आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा. ते स्वाभाविक आहे. परंतू निवडणुकीनंतरच महाविकास आघाडीमध्ये बसून यावर निर्णय घेण्यात येणार आहे. कार्यकर्त्यांमध्ये चर्चा असली तरी त्याला फार महत्त्व देण्यासारखे नाही. महायुतीत महाभारत सुरू आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हेच सांगतोय पुढे काय होते ते पहा, असे संकेत पटोले यांनी दिले आहेत.
तर काँग्रेस प्रभारी रमेश चेन्निथला यांनी भाजपला सत्तेतून हटवणे एवढेच महाविकास आघाडीचे लक्ष आहे. आता कोणतीही चर्चा होणार नाही. निकालानंतरच महाविकास आघाडी त्या संदर्भात चर्चा करेल, असे स्पष्ट केले आहे. या निवडणुकीत कोणीच लहान भाऊ नाही, मोठा भाऊ नाही. या निवडणुकीत अनेक छोट्या पार्टी आहे या सगळ्यांना सोबत घेऊन पुढे जात आहे, असे ते म्हणाले.
बाळासाहेब थोरात यांनी देखील नाना पटोले मुख्यमंत्री होणार, काँग्रेसचा मुख्यमंत्री होणार यावर बोलने टाळले आहे. मुख्यमंत्री पदावर आज काहीच बोलणार नाही. या विषयी आम्हाला वाद करायचा नाही असे थोरात यांनी म्हटले आहे. आघाडीचा निर्णय आघाडी म्हणून घेऊ. तो योग्य वेळी घेऊ. उत्साही कार्यकर्ते असतात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे नाव येत असतात. त्यावर लक्ष देण्याची गरज नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.