मुंबई : राज्यातील भाजपा-शिवसेना सरकारने अंतर्गत सुरक्षेसंदर्भात मांडलेला नव्या विधेयकाचा मसुदा पूर्णत: असंवैधानिक असून या माध्यमातून राजकीय दहशतवाद निर्माण करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. सर्व आघाड्यांवर सपशेल अपयशी ठरलेल्या सरकारला आता सत्तेतून पायउतार होण्याच्या भीतीने ग्रासले आहे. त्यामुळे स्वसुरक्षेसाठी नवा कायदा आणण्याचा घाट घातल्याची टीका विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.पत्रकार परिषदेत बोलतांना विखे म्हणाले, सरकारने या विधेयकाचा मसुदा तातडीने मागे घ्यावा या मागणीसाठी आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटणार आहोत. सरकार स्वत:हून हा मसुदा मागे घेणार नसेल, तर तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला.या कायद्याच्या माध्यमातून राज्य सरकारने आपले राजकीय हित आणि भाजपचे अर्थकारण चालविणाऱ्या मूठभर धनदांडग्यांना कायदेशीर संरक्षण देण्याचे कारस्थान रचले आहे. अमेरिकेतील काही कायद्यांची नक्कल करण्याचा प्रयत्न सरकारने केला आहे. परंतु नक्कल करायलाही अक्कल लागते. ज्यांचा मेंदूच गोठला आहे, ते अशा पद्धतीने कॉपी करून कदापिही पास होऊ शकत नाही, असा टोला विखे पाटील यांनी लगावला. या कायद्याच्या माध्यमातून राज्य सरकारने दहशतवाद आणि जनआंदोलनांना एकाच पारड्यात ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. पोलिसांना अमर्याद अधिकार देऊ केले आहेत. या कायद्याच्या माध्यमातून राजकीय, सामाजिक, कामगार अशा विविध क्षेत्रातील आंदोलने दडपण्याचा सरकारचा डाव आहे, अशी टीका विखे यांनी केली. (विशेष प्रतिनिधी)
अंतर्गत नव्हे; स्वसुरक्षेसाठी नवे विधेयक - विखे पाटील
By admin | Published: August 25, 2016 4:17 AM