- प्रज्ञा केळकर-सिंगपुणे - महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व असलेल्या पु. ल. देशपांडे यांच्या साहित्याचा परवानगीविना वापर केल्याने इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर अॅस्ट्रॉनॉमी अँड अॅस्ट्रोफिजिक्स (आयुका)ने काही प्रथितयश कलाकार व दिग्दर्शकांना नोटिसा पाठविल्या आहेत. पुलंचे जन्मशताब्दी वर्ष उद्या, गुरुवारपासून सुरू होत आहे. या निमित्ताने स्वामित्व हक्कासंदर्भातील वादावर एकदाचा पडदा पडेल, अशी आशा आहे.पुलंच्या मृत्यूनंतर सुनीताबार्इंनी केवळ पुलंनी लिहिलेल्या नाटकांच्या हक्कांचे प्रयोग खुले केले होते. यातील एकही शब्द बदलण्याची परवानगी नाही, अशी अटही घातली होती. त्यांनी १० आॅगस्ट २००६ रोजी केलेल्या मृत्युपत्रानुसार, पुलंच्या साहित्याचे अधिकार आयुकाकडे सोपविले, पण पुलंच्या साहित्य, नाटकांचा वापर कोणत्याही परवानगीविना होत असल्याचे लक्षात आल्याने आयुकाने कलाकारांना संमती न घेतल्याबाबत नोटिसा पाठविल्या.पुलंची नाटके व इतर पुस्तकांचे सुनीताबार्इंकडे असलेले हक्क त्यांनी ‘आयुका’ला दिले. पुलंच्या पश्चात २००९ पर्यंत म्हणजेच सुनीताबार्इंच्या निधनापर्यंत पुलंच्या साहित्यावरील आधारित कार्यक्रम, चित्रपट, व्हिडीओ इत्यादी अनेक परवानग्या सुनीताबार्इंनी स्वत:च दिल्या होत्या.पुल आणि आचार्य अत्रे यांच्या निवडक कलाकृतींवर ‘आम्ही आणि आमचे बाप’ हा कार्यक्रम अजित परब, पुष्कर श्रोत्री, अतुल परचुरे आणि आनंद इंगळे सादर करतात. या कार्यक्रमाचे दिग्दर्शन आदित्य इंगळे यांचे आहे. त्या कलाकारांना नोटिसा दिल्याचे समजते. मात्र, त्याचे प्रयोग सुरू आहेत. आयुकाकडून कोणतीही नोटीस आलेली नाही, असे अभिनेता पुष्कर श्रोत्री याने सांगितले. आयुकाचे निरंजन अभ्यंकर बाहेरगावी असल्याने त्यांच्याशी व कलाकार अतुल परचुरे यांच्याशी संपर्क झाला नाही.आम्ही उत्तर पाठवले‘नमुने’ या हिंदी मालिकेबाबत आयुकाने नोटीस पाठवली होती. त्या नोटिशीला उत्तरही पाठवण्यात आले आहे. आयुका अत्यंत सन्माननीय संस्था आहे. त्यामुळे याबाबतीत अधिक भाष्य करणे उचित ठरणार नाही. - नितीन वैद्य, दिग्दर्शक.
पुलंच्या साहित्याचा परवानगीविना वापर, आयुकाने धाडल्या दिग्दर्शक, कलाकारांना नोटिसा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 08, 2018 7:07 AM