कोल्हापूर : अंबाबाई विष्णूपत्नी आहे, असे मानून तिरूपतीहून येणारा शालू आम्ही आजवर स्वीकारत होतो. आता मात्र ती पत्नी नसून, आदिशक्ती व विष्णूची आई असल्याचे सत्य समोर आले आहे. त्यामुळे नवरात्रात येणारा हा शालू मुलाने आपल्या आईला पाठविलेले वस्त्र, या भावनेतून स्वीकारत आहोत, अशी भूमिका पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या सदस्या संगीता खाडे यांनी बुधवारी स्पष्ट केली. या भूमिकेमुळे गेल्या वर्षभरापासून ‘लोकमत’ने केलेल्या पाठपुराव्याला दुजोरा मिळाला आहे.२० वर्षांपूर्वी देवस्थान समितीच्या अध्यक्ष व सदस्यांना झालेल्या गैरसमजुतीतून अंबाबाई ही बालाजी पत्नी असल्याचा चुकीचा प्रचार सुरू झाला. त्यानंतर गेले वर्षभर विविध वृत्तांच्या माध्यमातून या विषयाचा पाठपुरावा करण्यात आला व सुरू झालेल्या चुकीच्या प्रथांवर सडेतोडपणे भाष्य केले होते. देवस्थान समितीने स्पष्ट केलेल्या भूमिकेमुळे ‘लोकमत’ने केलेल्या या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे.अष्टमीला बुधवारी सकाळी तिरूपती देवस्थानचे सहायक कार्यकारी अधिकारी आर. सेवलम व के. वाणी हे शालू घेऊन भवानी मंडपात आले. येथून वाद्यांच्या गजरात मिरवणुकीद्वारे अंबाबाई मंदिराला प्रदक्षिणा घालण्यात आली. नंतर शालू अंबाबाई चरणी अर्पण करून देवस्थानच्या सदस्या संगीता खाडे व सचिव शुभांगी साठे यांच्याकडे सुपूर्द केला. त्यानंतर संगीता खाडे यांनी शालू स्वीकारण्यामागची देवस्थान समितीची भूमिका प्रसारमाध्यमांसमोर मांडली. दसऱ्यादिवशी सकाळी तो अंबाबाईला अर्पण करण्यात येईल.
पत्नी म्हणून नव्हे, आई म्हणून स्वीकारला शालू
By admin | Published: October 22, 2015 1:46 AM