पुणे : भाजपने कधीच सुशांत सिंगने आत्महत्या केली की हत्या झाली हे विचारले नव्हते. एम्सचा बाबतीत जो रिपोर्ट येईल तो आम्ही स्वीकारणारच आहोत. आणि अद्याप सीबीआय रिपोर्ट जाहीर होणे बाकी आहे. पण गृहमंत्री अनिल देशमुखांना एवढी घाई का आहे? असा सवाल करत ''अजून बाळंतीण झाली नाही आणि तोवर हे नाव ठेवून मोकळेही झाले '' अशा शब्दात विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी गृहमंत्री अनिल देशमुखांना सणसणीत टोला लगावला आहे.
विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे पुणे दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी दरेकर यांनी अनिल देशमुखांनी महाराष्ट्र पोलिसांची बदनामी केली त्या गुप्तेश्वर पांडेंचा प्रचार करणार का? असा प्रश्न विचारत देवेंद्र फडणवीसांवर केलेल्या टीकेचा देखील खरपूस समाचार घेतला. ते म्हणाले, गुप्तेश्वर पांडेंनी कुठून उभं राहावं हा त्यांचा वैयक्तिक अधिकार आहे. आणि अद्याप त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला नाही. मात्र, राज्यातला कोविडचा प्रश्न व्यवस्थितपणे हाताळता आलेला नाही. तसेच कायदा सुव्यवस्था पूर्णपणे बिघडली आहे. महाराष्ट्रात रोज कुठेतरी हाथरससारख्या घटना घडत आहे. त्यावर लक्ष देण्याऐवजी व आपलं अपयश झाकण्यासाठीच गृहमंत्र्यांकडून अशी प्रकरण काढली जात आहेत. राज्यकर्त्यांनी राज्यकारभार चालवावा, व्यक्तिगत मुद्द्यांवर भूमिका घेऊ, असेही ते यावेळी म्हणाले. तसेच गृहमंत्री कधीच असे पुढे येऊन बोलले नव्हते. पण आता पोलीस आयुक्त, गृहमंत्री रोज बोलत आहेत. पण मुंबई पोलीस कोणत्याही एका पक्षाचे नाहीत, ते सगळ्यांचे आहेत.
अब्दुल सतार व्हायरल यांच्या 'त्या' क्लिपवर दरेकर म्हणाले...
ही कसली अराजकता सुरू आहे? मराठा आरक्षणाचा प्रश्न विचाराच अब्दुल सत्तार या मुजोर मंत्र्यांचा अहंकार दुखावला गेला. आई बहिणीवरून शिव्या दिल्या. महाराष्ट्राच्या परंपरेला हे शोभणारे नाही, पुरावा पडताळून त्यांना अटक करा, असे दरेकर यांनी स्पष्टपणे सांगितले.