पुणे : चलनातून बाद झालेल्या पाचशे, हजाराच्या लाखो नोटा जप्त करताना कर्तव्यात कसूर केल्यामुळे कोथरूड पोलीस ठाण्यातील फौजदारासह हवालदार, नाईक व शिपाई अशा पाच जणांना एक एप्रिलपासून पोलीस सेवेतून बडतर्फ करण्यात आले. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांच्या अधिकारात थेट बडतर्फी करण्याची पुणे शहर पोलीस दलातील ही पहिलीच वेळ आहे. फौजदार विक्रम प्रतापसिंह राजपूत, हवालदार हेमंत मधुकर हेंद्रे, नाईक अजीनाथ साहेबराव शिरसाट, शिपाई अश्वजित बाळासाहेब सोनवणे (बक्कल नं ७७५६)संदीप झुंबर रिटे अशी निलंबित कर्मचारी व अधिकाऱ्यांची नावे आहेत. मोठ्या प्रमाणात नोटा जप्त करुनही तब्बल २५ दिवस या प्रकरणाची माहिती पुढे न आल्याने या प्रकरणामागे गूढ होते.उपायुक्त पी. आर. पाटील यांनी याबाबत माहिती दिली. २ ते ३ फेब्रुवारी दरम्यान चलनातून बाद झालेल्या नोटा कोथरुड पोलीस ठाण्याच्या पथकाने जप्त केल्या. ६६ लाख रुपयांच्या नोटा जप्त केल्या असताना जप्ती पंचनाम्यामध्ये २० लाखांच्या नोटा जप्त केल्याचे दाखविले होते. (प्रतिनिधी)
नोटा बदली प्रकरण; फौजदारासह ५ बडतर्फ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 02, 2017 12:46 AM