योगेश पांडे / नागपूर‘नोट’बंदीची घोषणा झाल्यानंतर त्याचे मन:पूर्वक कौतुक केलेल्या संघाने आता मात्र सावध पवित्रा घेतला आहे. नोट बंदीमुळे सर्वसामान्य नागरिकांचे दैनंदिन जीवन अडचणीचे होत असल्याकडे माध्यमांनी लक्ष वेधल्यानंतर संघ ‘दक्ष’ झाला आहे. पंतप्रधानांनी नोटा बंदीची घोषणा केल्यानंतर संघाचे सहसरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनी तत्काळ केंद्र शासनाचे अभिनंदन केले. पंतप्रधानांचा हा निर्णय ऐतिहासिक असून काळा पैसा बाळगणाऱ्यांना व बनावट नोटांच्या व्यवसायात लिप्त असणाऱ्यांना हा मोठा धक्का आहे, अशी प्रतिक्रिया दिली होती. संघ स्वयंसेवकांसोबत सामान्य जनतेनेदेखील या बंदीचे स्वागत केले होते. मात्र सध्या देशात सुरू असलेला एकूण गोंधळ पाहता आता संघ ‘दक्ष’च्या भूमिकेत आहे. याबाबत संघाने स्पष्ट भूमिका घेतली नसली तरी सध्या देशभरात संघ स्वयंसेवक नागरिकांना मदत करत आहे, हे विशेष. देशात जी परिस्थिती उद्भवलेली आहे त्यावर संयम ठेवणे आवश्यक आहे. विरोधकांकडून जे काही राजकारण सुरू आहे, त्यापेक्षा अर्थकारण कसे सुधारेल, या मुद्यावर चर्चा व्हायला हवी, अशी प्रतिक्रिया अखिल भारतीय सहप्रचारप्रमुख जे. नंदकुमार यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
नोटबंदीबाबत संघ ‘दक्ष’!
By admin | Published: November 16, 2016 5:30 AM