ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 15 - नोटबंदी हा मोठा घोटाळा म्हणून समोर येईल, असा गंभीर आरोप काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर केला आहे. नोटबंदीमुळे श्रीमंतांपेक्षा गरिबांना अधिक त्रास सहन करावा लागतो आहे. मोदींनी बड्या धेंडांना सोडलं, मात्र गरिबांना त्रास दिला जातो आहे. बँकेसमोर गरीब जनता रांगेत उभी आहे. कुठलाही विचार न करता मोदी सरकारनं नोटबंदीचा निर्णय जाहीर केला, असं वक्तव्य राहुल गांधी यांनी केलं आहे. ते भिवंडी येथे बोलत होते. राहुल गांधी म्हणाले, काळा पैसा असलेल्यांना मोदींनी मोकळे सोडले. काळ्या पैशाला प्रतिबंध घालण्याचा विचार होता म्हणूनच 500, 1000च्या नोटांवर बंदी घातली. मात्र आता 2000च्या नोटा का आणल्या, असा सवालही राहुल गांधी यांनी उपस्थित केला आहे. राहुल गांधी उद्या भिवंडी कोर्टात हजर राहणार असल्यानं ते आज मुंबईत आले आहेत.यावेळी राहुल गांधींनी मोदी सरकारवर अनेक आरोप केले आहेत. पश्चिम बंगालमधील भाजप नेत्यांनी आधीच पैसे डिपॉझिट कसे केले?. नोटाबंदीचा निर्णय घेताना मोदींनी कुणालाही विश्वासात घेतलं नाही, असंही राहुल गांधी म्हणाले आहेत. मात्र मी मोदींच्या आईबद्दल काहीही चुकीचं बोलणार नाही, असंही राहुल गांधींनी सांगितलं आहे.
नोटबंदी मोठा घोटाळा म्हणून समोर येईल - राहुल गांधी
By admin | Published: November 15, 2016 9:19 PM