मुंबई : नोट बंदीमुळे मटक्याच्या धंद्यालाही झटका बसला आहे. रोकडच्या टंचाईमुळे व्यवहार पूर्णपणे ठप्प झाल्याचे चित्र राज्यभरात पहायला मिळत आहे.सध्या मटका खेळणारे पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा पुढे सरकवत आहेत. मात्र त्या रद्द करण्यात आल्याने त्या आम्ही स्विकारु शकत नाही. त्यामुळे हा धंदा पूर्णपणे ठप्प झाल्याची माहिती एका मटका आॅपरेटरने दिली. ८ नोव्हेंबरच्या रात्री नोटबंदी केल्यानंतर मटक्याच्या धंद्याला जोरदार झटका बसला. त्यानंतर कोमात गेलेला धंदा अजूनही बंदच आहे. तरीदेखील काही मटकावाले २० नोव्हेंबरपासून मटक्याचे शटर पुन्हा उघडण्याची शक्यता आहे. मार्केटमध्ये सध्या पैसाच नसल्याने हा धंदा पूर्णपणे बसला आहे. हवाला रॅकेटही पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याने पंटर लोकांना त्यांच्या बॉसेसना पैसा पाठवणेही ठप्प झाले आहे. आठ दिवसांपासून मटक्याचा धंदा पूर्णपणे बंद आहे. १९७७ नंतर पहिल्यांदा अशी स्थिती निर्माण झाल्याचे एका पंटरने ‘लोकमत’ला सांगितले. ज्या पंटर्सना बॉसेसकडून पैसे घ्यायचे होते, ते देखील आठ दिवसांपासून फोन बंद करुन बसल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. मटक्याच्या धंदा हा पूर्णपणे रोखीचा धंदा असल्याने नोटबंदीमुळे तो एका रात्रीत उखडला गेल्याचे दिसत आहे. मटका बुकींग घेण्यासाठी तसेच आकडा लागल्यावर करावे लागणारे पेमेंट कोणत्या नोटांनी करायचे, हा गुंता सध्यातरी या धंद्याला सोडवता आलेला नाही. साहजिकच आणखी काही काळ तरी तेजीत आकडे फुटणार नाहीत, अशी चिन्हे आहेत. (प्रतिनिधी)
मटक्यालाही नोटबंदीचा झटका!
By admin | Published: November 17, 2016 4:24 AM