ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 15 - दहावी आणि बारावीच्या सुमारे 22 लाख विद्यार्थ्याना परीक्षांचे अर्ज भरताना नोटांची अडचण येत असल्याने होती चिंतेत असणा-या विद्यार्थ्यांसहीत त्यांच्या पालकांना राज्य सरकारने दिलासा दिला आहे. विद्यार्थ्यांनी परीक्षेचा अर्ज आधी भरावा आणि शुल्क नंतर भरावे, असे शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी सांगितले आहे. तरीही ज्या विद्यार्थ्यांचे शुल्क भरण्याचे शिल्लक असल्यास अशा विद्यार्थ्यांना मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे दहावी आणि बारावीच्या परीक्षेला बसणा-या कोणत्याही विद्यार्थ्यांना नोटांच्या अडचणीमुळे परीक्षेला बसता येणार नाही असे होणार नाही, असे शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी स्पष्ट केले.
दहावी आणि बारावीच्या परीक्षेला बसणा-या विद्यार्थ्यांना नोटबंदी निर्णयामुळे प्रवेश शुल्क भरताना अनेक अडचणी येत आहेत. याबाबतच्या काही तक्रारी शिक्षक, पालक, विद्यार्थी संघटनांनी केल्या होत्या,असे सांगताना तावडे म्हणाले की, दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांनी आता प्रथम फॉर्म भरावा आणि नंतर शुल्क भरावे, त्यासाठी या विद्यार्थ्यांना फेब्रुवारीपर्यंत मुदत वाढ देण्यात येणार आहे. त्यामुळे विदयार्थ्यांनी तसेच त्यांच्या पालकांना चिंता करण्याचे काहीही कारण नाही, असेही त्यांनी सांगितले.
दहावीच्या परीक्षेला सुमारे 17 लाख तर बारावीच्या परीक्षेला सुमारे 14 लाख विद्यार्थी यंदा परीक्षेला बसणार आहेत,अशी माहिती देताना तावडे म्हणाले की,बारावीच्या विद्यर्थ्यांचे परीक्षा शुल्क भरण्याची प्रक्रिया जवळ जवळ संपली आहे. तरीही ज्या विद्यार्थ्यांनी शुल्क भरले नाही त्यांनाही सवलत देण्यात येणार आहे.
नाट्यगृहांमध्येही जुन्या नोटा स्वीकारण्याचे आदेश
नोटबंदीचा फटका मराठी चित्रपट आणि नाट्यसृष्टीलाही बसल्याची माहिती समोर येत आहे. नोटबंदीच्या निर्णयानंतर अनेक मराठी नाटकांचे प्रयोग पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यामुळे आता नाट्यगृहांनी जुन्या नोटा स्वीकाराव्यात, असे आदेशच शालेय शिक्षणमंत्री आणि सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी दिले आहेत. तावडे यांनी केलेल्या घोषणेमुळे नाट्यसृष्टीला दिलासा मिळाला आहे.