- लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : केवळ उंचीमुळे नोकरी जाऊ नये म्हणून नाशिकमध्ये उमेदवाराने विग घातला, अकोल्यात डोक्यावर पॅकिंग क्लीप चिकटवली, तर औरंगाबादमध्ये उमेदवाराने चक्क पायाला नाणे चिकटविले. त्यामुळे यंदाची पोलीस भरती चर्चेत आली. त्यात बुधवारी मुंबईत पार पडलेल्या लेखी परीक्षेत आपल्या मित्रासाठी त्याच्या जागी त्याचा मित्र डमी उमेदवार म्हणून परीक्षेला बसला. मात्र, तेथील पर्यवेक्षकाच्या नजरेत ही बाब येताच, त्याचे बिंग फुटल्याचा प्रकार चर्नीरोड येथील परीक्षा केंद्रावर उघडकीस आला. याप्रकरणी डमी उमेदवाराविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.राज्यभरात ५९७१ पोलीस शिपाई पदांसाठी पोलीस भरती सुरू आहे. यापैकी मुंबईत १७०० जागांसाठी तब्बल १ लाख ७२ हजार उमेदवार रिंगणात आहेत. मैदानी परीक्षेनंतर बुधवारी मुंबईच्या विविध परीक्षा केंद्रांवर लेखी परीक्षा पार पडली. या वेळी परीक्षा केंद्र क्रमांक १०च्या चर्नीरोड येथील सेंट टेरेसा हायस्कूलमध्ये लेखी परीक्षा देत असताना एका उमेदवाराच्या संशयास्पद हालचालींवर पर्यवेक्षकांची नजर पडली. त्यांनी त्याच्याकडे चौकशी केली असता, तो डमी उमेदवार असल्याचे उघड झाले. सज्जन मोतीलाल सतवन (२३) असे डमी उमेदवाराचे नाव असून, त्याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याविरुद्ध ४१९, ४६५, १२०(ब) अन्वये कारवाई करण्यात आली आहे. मूळचा औरंगाबादचा रहिवासी असलेला अंमील ढगे याच्या जागेवर तो परीक्षा देत होता. सज्जनही औरंगाबादचा रहिवासी आहे. दोघेही जिवलग मित्र आहेत. एकत्रच अभ्यास करायचे. सतवन हा अभ्यासात हुशार असल्याने त्याने सतवनला आपल्या जागी परीक्षेला बसण्यास सांगितले. मैत्रीसाठी सतवन त्याच्या जागी परीक्षेला बसला. मात्र, पोलिसांच्या नजरेतून तो सुटला नाही.अधिक तपास सुरूतोतया उमेदवाराविरुद्ध गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात आली आहे. तोतया उमेदवाराने यापूर्वीही अशा प्रकारे दुसऱ्याच्या नावे परीक्षा दिली आहे का? याचा तपास सुरू असल्याची माहिती पोलीस उपायुक्त ज्ञानेश्वर चव्हाण यांनी दिली. डमी आरोपी बी.ए. पाससज्जन सतवन हा बी.ए. झालेला आहे. वडील आणि दोन भावांसोबत तो राहतो. याप्रकरणात ढांगे याच्या मैत्रीसाठी तो डमी म्हणून बसला होता. ढांगेचाही शोध सुरू आहे. दोघांमध्ये पैशांचेही व्यवहार झाले नव्हते. फक्त परीक्षेत पास झाल्यानंतर ढांगे आनंदाने देईल ते तो स्वीकारणार होता, असे त्याने पोलीस चौकशीत सांगितले. व्ही. पी. रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संजय कांबळे यांच्या मार्गदर्शंनाखाली आरोपी ढांगेचा शोध सुरू आहे.