उल्हासनगर : महापालिका एलबीटी विभागातील घोटाळ्याप्रकरणी सामान्य प्रशासन विभागाने आयुक्तांच्या आदेशान्वये ५० कर्मचाऱ्यांना नोटिसा दिल्या आहेत. या प्रकाराने खळबळ उडाली असून, ३ महिन्यापूर्वीच १६ कर्मचाऱ्यांना निलंबित करत आयुक्तांनी विभागीय चौकशी सुरू केली आहे. शासन निर्णयानुसार पालिकेतील जकात बंद करून एलबीटी सुरू करण्यात आली. जकातीपासून दरमहा १६ कोटी तर एलबीटीपासून ८ कोटींचे उत्पन्न पालिकेला मिळाले आहे. कर्मचारी, व्यापारी व स्थानिक नेत्यांच्या संगनमताने एलबीटी उत्पन्न कमी झाल्याची टीका होऊन त्यात नगरसेवक गुंतल्याची चर्चा महासभेत झाली. विभागाचे उपायुक्त जमीर लेंगरेकर यांनी कर्मचाऱ्यांच्या चौकशीची मागणी आयुक्तांकडे लावून धरली होती. त्यानुसार, चौकशी सुरू झाली आहे.पालिका आयुक्तांच्या आदेशान्वये सामान्य प्रशासन विभागाने शनिवारी ५० कर्मचाऱ्यांना नोटिसा दिल्या आहेत. एलबीटीचे उत्पन्न कमी का, याचे स्पष्टीकरण कर्मचाऱ्यांना द्यावे लागणार असून चौकशीअंती कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त मनोहर हिरे यांनी दिली आहे. एलबीटी कर प्रणालीपूर्वी जकातीपासून पालिकेला दरमहा १६ कोटींचे उत्पन्न मिळत होते. त्यानुसार, एलबीटीपासून किमान १८ कोटींचे दरमहा उत्पन्न अपेक्षित होते. ९० टक्के व्यापाऱ्यांचे विवरणपत्र नाही एलबीटी विभागातील ९० टक्के व्यापाऱ्यांनी वर्षानुवर्षांचे वार्षिक विवरणपत्र सादर केले नसल्याची माहिती उपायुक्त जमीर लेंगरेकर यांनी दिली आहे. विभागाने १२ हजारांपेक्षा जास्त व्यापाऱ्यांना नोटिसा पाठवून ५ हजार रुपये दंड ठोठावला. तसेच ७० पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांवर वसुली कमी करणे, व्यवहारात अनियमितता, वारंवार तक्रारी असा ठपका ठेवण्यात आला आहे. त्यापैकी ५० कर्मचाऱ्यांना सामान्य प्रशासन विभागाने नोटिसा पाठवून कारणे मागितली आहेत.
एलबीटी घोटाळासंबंधी ५० कर्मचाऱ्यांना नोटीस
By admin | Published: December 21, 2015 2:08 AM