नागपूर : कोट्यवधी रुपयांच्या शिष्यवृत्ती घोटाळ्याचा तपास करणाऱ्या टास्क फोर्सच्या वैधतेच्या मुद्द्यावर आवश्यक वेळ देऊनही उत्तर सादर न केल्यामुळे गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी कारणे दाखवा नोटीस बजावली. या प्रकरणी २७ एप्रिलपर्यंत स्पष्टीकरण सादर करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले. तसेच, टास्क फोर्सचे अध्यक्ष पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांनाही उत्तर सादर करण्यास सांगितले.प्रकरणावर न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी व न्यायमूर्ती विनय देशपांडे यांच्यासमक्ष सुनावणी झाली. शिष्यवृत्ती घोटाळ्याचा तपास अवैधपणे करण्यात येत असल्याचा आरोप करून काही शिक्षण संस्थांनी न्यायालयात रिट याचिका दाखल केल्या आहेत. न्यायालयाने १८ फेब्रुवारी २०१६ रोजी समाज कल्याण विभाग किंवा आदिवासी विकास विभागाच्या अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करण्याचा अंतरिम आदेश दिला होता. परंतु, या आदेशाचे उल्लंघन करून शिक्षण संस्थांच्या पदाधिकाऱ्यांच्या घरी पोलीस पाठविण्यात येत आहेत. शासनाने स्थापन केलेली टास्क फोर्स अवैधपणे कार्य करीत आहे, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)
गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांना नोटीस
By admin | Published: April 06, 2017 5:04 AM