नवी मुंबई : वाशी रेल्वे स्टेशनसमोर मध्य रेल्वेच्यावतीने रूग्णालय बांधण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. आपघातग्रस्तांवर तत्काळ उपचार करता यावेत यासाठी हा निर्णय घेतला असून रूग्णालयाच्या इमारतीला पालिकेच्या अतिक्रमण विभागाने नोटीस पाठविली आहे. तत्काळ बांधकाम पाडले नाही तर कारवाईचा इशारा दिला असून आयुक्त मुंढे खरोखर बांधकाम पाडणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. हार्बर व ट्रान्स हार्बर मार्गावरील आपघातामध्ये दिवसेंदिवस वाढ होवू लागली आहे. प्रत्येक वर्षी किमान २०० प्रवाशांचा मृत्यू होत असून तेवढेच प्रवासी जखमी होत आहेत. अपघात घडल्यास रूग्णांना वाशी महापालिका रूग्णालयात किंवा सायन रूग्णालयात घेवून जावे लागते. वेळेत उपचार न मिळाल्याने अनेकांचा मृत्यू होत असतो. अपघातग्रस्तांना तत्काळ उपचार मिळावे यासाठी रेल्वे प्रशासनाने महत्त्वाच्या रेल्वे स्टेशनच्या आवारामध्ये रूग्णालय सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. हार्बर मार्गावर वाशी रेल्वे स्टेशनच्या टॉवर क्रमांक ६ च्या बाहेर रूग्णालयाचे काम सुरू करण्यात आले आहे. रूग्णालयाचे बांधकाम पूर्ण होत आले असताना वाशी विभाग कार्यालयाने या बांधकामाला नोटीस दिली आहे. ५०० मीटर जागेमध्ये अनधिकृत बांधकाम सुरू करण्यात आले आहे. नोटीस मिळताच तत्काळ बांधकाम थांबवावे व ते स्वत:हून निष्कासित करून जमीन पूर्वी होती तशी करण्यात यावी असा इशारा दिला आहे. पालिकेने २३ फेब्रुवारीला ही नोटीस दिली असल्याने आता रूग्णालय होणार की नाही याविषयी साशंकता निर्माण झाली आहे. अपघातग्रस्तांना मदत मिळावी यासाठी मध्य रेल्वेच्यावतीने रूग्णालयाची उभारणी करण्यात येत होती. पण महापालिकेने नोटीस पाठवून कारवाईचा इशारा दिला आहे. पालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी कोणाच्याही अतिक्रमणाला पाठीशी घातले जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. अतिक्रमण करणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले जाण्याचे इशारेही दिले आहेत. यामुळे आता मध्य रेल्वेच्या रूग्णालयावर कारवाई होणार का व ज्यांनी बांधकाम केले त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जाणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)
रेल्वे रूग्णालयास अतिक्रमण विभागाची नोटीस
By admin | Published: March 07, 2017 2:24 AM