ऑनलाइन टीम
मुंबई, दि. १६ - पोलीस भरतीदरम्यान चार तरूणांचा मृत्यू झाल्याची गंभीर दखल घेत उच्च न्यायालयाने राज्य सरकारला नोटीस बजावली आहे. येत्या सात दिवसांत या नोटीसीचे उत्तर देण्याचा आदेश न्यायालयाने दिला असून पुढील सुनावणी २३ जून रोजी होणार आहे.
मुंबईत सुरू असलेल्या पोलीस भरतीसाठी आलेल्या शारिरीक चाचणीपरीक्षेदरम्यान आत्तापर्यंत चार तरूणांचा मृत्यू झाला आहे. राहुल सपकाळ, अंबादास सोनावणे, साईप्रसाद माळी आणि विशाल केदारे या चौघांना धावण्याच्या चाचणी दरम्यान चक्कर आली होती. रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचा गेल्या आठवड्यात मृत्यू झाला. या घटनेचा सर्व स्तरांतून निषेध नोंडवण्यात आला होता, तसेच मुंबई पोलिस आणि राज्य सरकार विरोधात अनेकांनी तीव्र संताप व्यक्त केला. गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी या चारही तरूणांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांची मदतही जाहीर केली होती. तसेच यापुढे पोलिस भरतीदरम्यान पाच किलोमीटरचे अंतर तीन किमी केली जाईल, असेही त्यांनी सांगितले होते.
दरम्यान उच्च न्यायालयाने या सर्व प्रकरणाची दखल घेत उच्च 'स्यू मोटो' याचिका दाखल करुन घेतली. त्यावरील पुढील सुनावणी २३ जून रोजी होणार असून पोलीस दलासह राज्य सरकारलाही याप्रकरणी उत्तर द्यावे लागणार आहे.