पुणे : महिला पदाधिकाऱ्याबद्दल अश्लील भाषा वापरल्याचे व्हॉइस क्लिप व्हायरल झाल्यावर राष्ट्रवादीचे सोलापूर जिल्ह्याध्यक्ष आणि माजी आमदार दीपक साळुंखे यांना पक्षाने नोटीस पटवून स्पष्टीकरण मागवल्याची माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे. महिला अत्याचाराच्या संदर्भात 'मी टू' मोहीम सोशल मीडियावर जोर झरत असताना राजकीय पक्षांचेही बुरखे फाटताना दिसत आहेत. त्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाही समावेश होण्याची शक्यता आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, साळुंखे यांची एक व्हॉइस क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. त्यात त्यांनी अक्कलकोट भागातील पदाधिकाऱ्यांच्या निवडीविषयी प्रश्न उपस्थित करण्यात आला. त्यावर बोलताना साळुंखे यांनी आक्षेपार्ह्य भाषा वापरली आहे. त्यात त्यांनी शरद पवार, स्थानिक नेते आणि महिला पदाधिकाऱ्याचा उल्लेख करत आपली मते मांडली आहे. या क्लिपमुळे सोलापूरसह राष्ट्रवादीच्या गोटातही खळबळ उडाली आहे. मात्र आजपर्यंत पक्षातर्फे त्यावर काहीही प्रतिक्रिया देण्यात येत नव्हती.
सुळे यांना पुण्यातील पत्रकार परिषदेत विचारले असता त्यांनी 'या विषयावर मी स्वतः प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासोबत बोलले आहे. त्यांचे स्पष्टीकरण आल्यावर निर्णय घेतला जाईल' अशी माहिती दिली. या विषयावर अधिक काहीही बोलण्यास त्यांनी असमर्थता दर्शवली. त्यामुळे या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पावित्र्याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे .