Maharashtra Covid-19 Updates: कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या (Third Wave of Corona) पार्श्वभूमीवर जास्तीत जास्त कोरोना चाचण्या (Covid 19 Test) करण्याचा सल्ला सरकारकडून वारंवार दिला जात आहे. पण राज्यातील अशा अनेक वैद्यकीय लॅब आहेत की सरकारनं केलेल्या आवाहनाचा अजिबात फरक पडत नाहीय. राज्यात अशा अनेक खासगी लॅब आहेत की ज्यांनी खूप आधी सरकारकडून कोरोना चाचण्यांसाठीची परवानगी घेतली होती. पण त्यांनी आजवर एकही कोरोना चाचणी केलेली नाही. अशा खासगी लॅबला आता नोटिस पाठवण्यात येत आहेत. तसंच परवाना रद्द करण्याचा इशारा देखील सरकारनं दिला आहे.
औरंगाबाद महापालिकेनं आतापर्यंत अशा १५ खासगी लॅबला नोटिस धाडली आहे. शहरात ३९ खासगी लॅबला रॅपिड अँटिजन आणि आरटीपीसीआर चाचणी करण्याचा परवाना देण्यात आला आहे. पण १५ खासगी लॅबनं अजूनपर्यंत एकही कोरोना चाचणी केलेली नाही. या सर्व लॅबला नोटिस पाठवण्यात आली आहे. तुम्हाला देण्यात आलेला कोरोना चाचणीचा परवाना रद्द का केला जाऊ नये? असा सवाल महापालिकेनं या लॅबला विचारला आहे. तसंच कोरोना चाचणी का केली गेली नाही याचं उत्तर लॅब चालकांकडे मागितलं आहे.
'या' खासगी लॅबला धाडली नोटिस-परवाना मिळूनही आजवर एकही कोरोना चाचणी न करणाऱ्या १५ खासगी लॅबमध्ये एमआयटी हॉस्पीटल, एशियन सिटी केअर, मराठवाडा लॅब रोशनगेट, मिलिट्री हॉस्पीटल छावणी, यशवंत गाडे हॉस्पीटल गारखेडा, आयएमए हॉल शनिमंदीरजवळ, गणेश लॅब्रोटरी पुंडलिकनगर, ओरियन सिटी केअर हॉस्पिटल, अमृत सिटी केअर हॉस्पीटल, अमृत पॅथोलॉजी लॅब जानला रोड, सुमनांजली नर्सिंग होम, युनिसेफ पॅथोलॉजी लॅब भडकलगेट, कृष्णा डायग्नोस्टिक, कस्तूरी पॅथ लॅब गारखेडा, सह्याद्री हॉस्पीटल सिडको एन-२ लॅब यांचा समावेश आहे.