लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कॅनेडियनच्या हत्येप्रकरणी सुटका करण्यात आलेल्या ज्येष्ठ नागरिकाची बाजू ऐकून घेण्यासाठी उच्च न्यायालयाने त्याला नोटीस बजावली आहे. २००३ मध्ये झालेल्या हत्येप्रकरणी सत्र न्यायालयाने नरेंद्र गोयल (६६) याची आरोपमुक्तता केली. मात्र राज्य सरकारने सत्र न्यायालयाच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले.व्यवसायाने डॉक्टर असलेल्या आशा गोएल (६२) २००३ मध्ये कॅनडाहून भावाच्या घरी राहायला आल्या होत्या. १४ आॅगस्ट २००३ रोजी आशा यांची मलबार हिल येथील भावाच्या राहत्या घरी हत्या करण्यात आली. पोलिसांना त्यांच्या शरीरावर एकूण २१ जखमा आढळल्या. या प्रकरणी पोलिसांनी आशा यांच्या भावाच्या जावयाला घटनेनंतर दोन वर्षांनी अटक केली. आशा यांची हत्या करणाऱ्या प्रदीप परब याने चौकशीत पोलिसांना सर्व माहिती दिली. त्यामुळे पोलिसांनी त्याला माफीचा साक्षीदार करत नरेंद्र व अन्य दोघांवर आरोप निश्चितीची सत्र न्यायालयाकडे मागणी केली. त्याचवेळी नरेंद्रनेही आरोपमुक्ततेसाठी अर्ज केला.सरकारी वकिलांच्या म्हणण्यानुसार ही हत्या संपत्तीच्या वादातून झाली. दरम्यान, सत्र न्यायालयाने नरेंद्रचा आरोपमुक्ततेचा अर्ज मान्य केला. आरोप सिद्ध करण्यासाठी ठोस पुरावे नाहीत, असे निरीक्षण नोंदवत नरेंद्रला आरोपमुक्त केले. सत्र न्यायालयाच्या या निर्णयाला सरकारने उच्च न्यायालयात आव्हान दिले. त्यावर न्यायालयाने नरेंद्र यांना नोटीस बजावत ११ जुलैपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले.
‘त्या’ ज्येष्ठ नागरिकाला नोटीस
By admin | Published: June 27, 2017 2:12 AM