मुंबई - काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना नॅशनल हेराल्ड प्रकरणामध्ये चौकशीसाठी ईडीने नोटिस पाठवली आहे. ८ जून रोजी चौकशीसाठी हजर राहण्याची नोटिस ईडीने सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना पाठवली आहे. दरम्यान, ईडीने पाठवेल्या नोटिशीवरून काँग्रेस कमालीची आक्रमक झाली आहे. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना ईडीने पाठवलेली नोटिस हा लोकशाहीवरील हल्ला असल्याची टीका काँग्रेस नेते आणि राज्य सरकारमधील मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.
आज सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना ईडीची नोटिस आल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना बाळासाहेब थोरात यांनी केंद्र सरकार आणि भाजपावर टीका केली, ते म्हणाले की, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना ईडीने नोटिस पाठवल्याची बातमी ऐकली आहे. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना ईडीने पाठवलेली नोटिस हा भारतीय लोकशाहीवरील हल्ला आहे. ही बाब देशाच्या भविष्याबाबत चिंता वाढवणारी आहे. आठ वर्षांपासून आपण पाहतोय की, तपास यंत्रणांचा गैनरवापर करून विरोधकांचा छळ करायचा. धार्मिक तेढ वाढवाचे. यामधून लोकशाहीवर आघात केला जात आहे. या संपूर्ण प्रकरणात काँग्रेसजनांसोबत देशातील जनता सोनियाजी आणि राहुल गांधींसोबत आहे, असे बाळासाहेब थोरात म्हणाले.
यावेळी केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवायांवरून थोरात यांनी भाजपावर जोरदार टीका केली. केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून विरोधकांना नामोहरम करण्याचे प्रयत्न केले जात आहे. मात्र त्यांचे हे प्रयत्न यशस्वी होणार नाही. जनता आमच्यासोबत आहे. ती भाजपाला जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
दरम्यान, नॅशनल हेराल्ड वृत्तपत्राच्या मालकीच्या पक्ष-प्रचारित यंग इंडियनमधील कथित आर्थिक अनियमिततेच्या चौकशीसाठी नुकताच हा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याच्या (पीएमएलए) फौजदारी कलमांतर्गत सोनिया आणि राहुल गांधी यांचे जबाब नोंदवायचे आहेत. नॅशनल हेराल्ड असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड (AJL) द्वारे प्रकाशित केले जाते आणि यंग इंडियन प्रायव्हेट लिमिटेडच्या मालकीचे आहे. तपासाचा भाग म्हणून एजन्सीने अलीकडेच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे आणि पवन बन्सल यांची चौकशी करण्यात आली होती.