औरंगाबाद : जगमित्र साखर कारखाना सुरू करण्यासाठी घेतलेल्या जमीन खरेदीतील फसवणुकीप्रकरणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने राज्य सरकारसह इतरांना नोटिसा बजावण्याचे आदेश दिले आहेत. न्यायमूर्ती एस.एस. शिंदे आणि न्यायमूर्ती एआयएस चिमा यांच्या खंडपीठाने राज्य सरकारसह बीडचे पोलीस अधीक्षक, बर्दापूरचे पोलीस निरीक्षक आणि पोलीस महासंचालकांना नोटिसा बजाविण्याचे आदेश दिले आहेत. तळणी (ता. अंबाजोगाई) येथील मुंजा किसनराव गिते यांची ३ हेक्टर १२ आर जमीन मुंडे यांनी जगमित्र कारखान्यासाठी २०१२ मध्ये खरेदी करण्यात आली होती. त्यासाठी दहा लाख रोख, ४० लाखांचा धनादेश तसेच कुटुंबातील चार सदस्यांना कारखान्यात नोकरी देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. त्यामुळे गिते यांनी ६ जुलै २०१२ रोजी खरेदी खत करून जमिनीची विक्री केली होती.मात्र कारखान्याचा ४० लाखांचा धनादेश बँकेत वठला नाही. याप्रकरणी फसवणूक झाल्याने गिते यांनी धनंजय मुंडे, वाल्मीक कराड आणि सूर्यभान मुंडे यांच्याविरुद्ध बर्दापूर पोलीस ठाण्यात १३ जुलै २०१५ रोजी तक्रारदिली होती. मात्र, गुन्हा दाखल झाला नाही. त्यामुळे गिते यांनी न्यायालयात याचिका दाखल केली. (प्रतिनिधी)
धनंजय मुंडेंवर गुन्हा नोंदविण्यास राज्य सरकारला खंडपीठाची नोटीस
By admin | Published: July 18, 2015 12:40 AM