काशिनाथ वाघमारे
सोलापूर, दि. ५ - जिल्ह्यातील साखर कारखाने, इतर उद्योग, नद्यांचे प्रदूषण, हवेतील प्रदूषणाची गुणवत्ता तपासून नियंत्रणात आणण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळ कार्यालयाने प्रयत्न सुरू केले आहेत. वर्षभरात ४० साखर कारखाने, चिंचोळी आणि अक्कलकोट रोड एमआयडीसीतील २० कारखाने तर ५० औद्योगिक घटकांना कारणे द्या नोटीस बजावली आहे. तसेच काही कारखान्यांवर कारवाईदेखील केली आहे. पर्यावरण जपण्यातील एक पाऊल म्हणून हे कार्यालय याकडे पाहत आहे.
सोलापूर शहरात तीन एमआयडीसी आहेत. या एमआयडीसींसाठी 2 सामायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्र उभारले आहेत. चिंचोळी एमआयडीसीमध्ये १०५ दशलक्ष एमएलडी तर अक्कलकोट रोड एमआयडीसीमध्ये ३ दशलक्ष एमएलडी क्षमतेचे दोन सांडपाणी प्रक्रिया केंद्र उभारले आहेत. सिद्धेश्वर यात्राकाळात होम मैदानावरील धूळ नियंत्रणाचे काम प्रदूषण नियंत्रण मंडळाला करावे लागले. महानगरपालिका आवारात स्वयंचलित हवा गुणवत्ता मोजमाप केंद्र आणि वोरोनोको वालचंद इंजिनीअरिंग कॉलेज या दोन ठिकाणी हवा गुणवत्ता मोजमाप केंद्र उभारले आहेत. याशिवाय कुरघोट येथील आणि भोगाव येथील अल मुस्तफा कत्तलखाने बंद केले आहेत. याशिवाय पर्यावरण जोपासण्यासाठी हवा आणि जल प्रदूषणाच्या अनुषंगाने प्रदूषण नियंत्रण मंडळ विविध घटकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पावले उचलली आहेत.
----------------------------------------------------------------------
नैसर्गिक साधनसंपत्तीचा वारेमाप वापर टाळा
-प्लास्टिकचा वापर शक्यतो टाळा, शक्य नसेल तर तिचा कमीत कमी वापर करा
-सांडपाण्यावर प्रक्रिया करा, या पाण्याचा पुनर्वापर करा़ इतर गोष्टींवर नाहक पाणी वापर टाळा
-स्वयंचलित वाहनांचा कमी वापर करा, सार्वजनिक वाहनांचा सर्वाधिक वापर करा
-शेतीमध्ये कमीत कमी रासायनिक खतांचा वापर करा
-कोठे प्रदूषण होत असेल तर प्रदूषण नियंत्रण मंडळाला कळवा, प्रदूषण रोखायला मदत करा
------------------------------------------------------------
नमामि चंद्रभागाचे सर्वेक्षण ३ महिने चालणार
-चंद्रभागा ही यापुढे स्वच्छ राहील, प्रदूषणविरहित राहील, यासाठी महाराष्ट्र शासनाने मोठे काम हाती घेतले आहे. नदीची सुरुवात ते शेवटपर्यंत स्वच्छता ठेवण्याच्या उद्देशाने संबंधित विविध घटकांच्या माध्यमातून कामाला सुरुवात झाली आहे़ महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ त्यापैकी एक़ नदीच्या विविध टप्प्यात पाण्याची गुणवत्ता तपासणी मळी, सांडपाणी मिसळण्याचे केंद्र, त्यावर नियंत्रण, अशा अनेक गोष्टी प्रदूषण नियंत्रण मंडळाला कराव्या लागणार आहेत. उजनी-कुडल संगम मार्गावर चंद्रभागाच्या किनाऱ्यावर अनेक गावचे सांडपाणी, साखर कारखान्यांकडून पाण्यात सोडली जाणारी मळी, काठावरील कंपन्यांकडून मिसळणारे केमिकल, शेतीतून खतरूपाने पावसाद्वारे वाहून जाणारे कीटकनाशक, अतिक्षार अशा अनेक गोष्टींचा अभ्यास आणि सर्वेक्षणाचे काम प्रदूषण नियंत्रण मंडळ करीत आहे़ या कामाला सुरुवातही झाली आहे़ येत्या ३ महिन्यात सर्वेक्षण आणि अहवालाचे काम पूर्ण करावे लागणार आहे.
-------------------------------------
३ महिन्यात संपणार असले तरी ते पुढे कायम राहणार आहे़ नदी स्वच्छतेनंतर इतर घटकांकडून पुन्हा प्रदूषित होणार आहे काय? यावर प्रदूषण नियंत्रण मंडळाला काम करावे लागणार आहे़ - नवनाथ आवताडे, उपप्रादेशिक अधिकारी, राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ