पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या वतीने आपल्या क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात कारवाई सुरू करण्यात आली असून, याचाच एक भाग म्हणून हवेली, मुळशी आणि मावळ तालुक्यांतील तब्बल ९ हजार ३१ अनधिकृत बांधकामांना नोटिसा देण्यात आल्या आहेत. प्राधिकरणाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या मोबाईल अॅपद्वारे नागरिक मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामांच्या तक्रारी करत आहेत. तसेच पीएमआरडीच्या पथकानेदेखील काही अनधिकृत बांधकामे शोधून काढली आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने करण्यात आलेल्या सर्व्हेच्या आधारेदेखील या अनधिकृत बांधकामांना नोटिसा देण्यात येत आहेत. या सर्व अनधिकृत बांधकामांवर महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियमातली (एमआरटीपी) कायद्यातील तरतुदीनुसार पीएमआरडीएकडून कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती विशेष कार्य अधिकारी अण्णासाहेब चव्हाण यांनी दिली. पीएमआरडीच्या वतीने आतापर्यंत तीन अनधिकृत बांधकामे पाडून टाकण्यात आली असून, दहा प्रकरणांमध्ये संबंधित व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे भविष्यात अनधिकृत बांधकामांवरील कारवाई तीव्र करण्यात येणार असल्याचे चव्हाण यांनी स्पष्ट केले.(प्रतिनिधी)
पीएमआरडीए क्षेत्रातील ९ हजार अनधिकृत बांधकामांना नोटिसा
By admin | Published: September 24, 2016 1:00 AM