काँग्रेस, राष्ट्रवादीकडील साखर कारखान्यांना नोटिसा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2018 01:31 AM2018-09-17T01:31:13+5:302018-09-17T06:48:18+5:30
११ कारखान्यांवर पाच जिल्हा बँकांचे १,२२३ कोटी रुपयांचे कर्ज थकीत; ‘श्वेतपत्रिका’ काढणार
मुंबई : राज्यातील पाच जिल्हासहकारी बँकांचे तब्बल १२२३.९३ कोटी रुपयांचे कर्ज थकवल्याबद्दल राज्य सरकारने ११ मोठ्या साखर कारखान्यांना नोटीसा बजावल्या आहेत. हे सर्व साखर कारखानेकाँग्रेस व राष्टÑवादीच्या मातब्बर नेत्यांचे आहेत.
सोलापूर, वर्धा, नाशिक, बुलडाणा व उस्मानाबाद या पाच जिल्हा सहकारी बँकांनी आघाडी सरकारच्या काळात ११ सहकारी साखर कारखान्यांना सरकारी हमीवर कर्ज वितरण केले होते. पण या कारखान्यांनी कर्जाची परतफेड केलेली नाही. त्यामुळे या बँकांची रोख तरलता संकटात आली आहे. त्यामुळे कर्जवसुलीसाठी वित्त विभागाने सहकार विभागाच्या मार्फत या कारखान्यांना नोटिसा बजावल्या आहेत. सहकार क्षेत्रात जनतेच्या पैशाची कशी लूट केली जात आहे, हे सर्वांसमोर यावे यासाठी सहकार क्षेत्रावर लवकरच ‘श्वेत पत्रिका’ काढण्यात येणार आहे, असे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.
भाजपा द्वेषाचे राजकारण करतेय...
विरोधकांच्या कारखान्यांना काढलेल्या नोटिसा आणि सहकारावर ‘श्वेत पत्रिका’ काढण्याच्या सरकारच्या निर्णयावर काँग्रेस, राष्टÑवादीने टीका केली.
सरकारने या चार वर्षात श्वेतपत्रिका का काढली नाही. राज्याची आर्थिक स्थिती खालावलेली आहे. त्यामुळे स्वत:चे अपयश झाकण्यासाठी मुनगंटीवार विरोधकांवर आरोप करीत आहेत.
- नवाब मलिक, राष्टÑवादीचे प्रवक्ते
सहकारी चळवळ मोडित काढण्याचा हा डाव आहे.
- सचिन सावंत, काँग्रेसचे प्रवक्ते