मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार आमदारांच्या अपात्रतेबाबत पुढील कार्यवाहीला विधिमंडळाने सुरुवात केली आहे. विधानसभा अध्यक्षांकडे ठाकरे व शिंदे गटाच्या यासंदर्भातील पाच याचिका असून त्याबाबत दोन्ही गटांना नोटिसा बजावून त्यांचे स्पष्टीकरण मागविण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे शिवसेना पक्ष कुणाचा हे ठरविण्यासाठी दोन्ही पक्षांचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्याकडून पक्षाची घटना, तसेच बैठकांमध्ये झालेल्या ठरावांची प्रत मागविण्यात येणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाने १६ आमदारांच्या अपात्रतेबाबतचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला. हा निर्णय घेण्याआधी काेणत्या गटाचा शिवसेना पक्ष हा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर घेणार आहेत. हे ठरविण्यासाठी आता दोन्ही पक्षांच्या प्रमुखांकडून पक्षाच्या घटनेची प्रत मागविण्यासाठी नोटीस पाठविण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे पक्षातील नेमणुकांबाबत झालेल्या बैठका आणि त्यात झालेले ठराव यांच्यासंदर्भातील कागदपत्रे मागविण्यात येणार आहेत.
पाच याचिकांवर निर्णय घ्यावा लागणार- सुरुवातीला ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांच्याकडून बजावण्यात आलेला व्हिप. त्याचे पालन न केल्याने १६ आमदारांना अपात्र ठरविण्याच्या मागणीबाबतची याचिका. - शिंदे गटाकडून भरत गोगावले यांना प्रतोद म्हणून नियुक्त केल्यानंतर त्यांनी ठाकरे गटातील आमदारांना पाठविलेली नोटीस. - त्यांना अपात्र ठरविण्यासाठी विधानसभा अध्यक्षांकडे केलेली मागणी अशा पाच याचिका परस्परांविरोधात दाखल झाल्या आहेत. - त्यामुळे प्रभू आणि गोगावले यांना या नोटिसा पाठविण्यात येणार आहेत. व्हिप, गटनेत्यांची, अध्यक्षांची केलेली निवड याबाबत नोंदविण्यात आलेल्या आक्षेपांसंदर्भात स्पष्टीकरण विचारण्यात येणार आहे.
दोन आमदार वगळले- एकमेकांविरोधात करण्यात आलेल्या याचिकांमध्ये ५४ आमदारांचा समावेश आहे. - मात्र, यामधून ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे आणि ऋतुजा रमेश लटके यांना वगळण्यात आले आहे.