मुंबई - उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी नाणार प्रकल्पासाठीच्या भूसंपादनाची अधिसूचना रद्द केल्याची घोषणा केली होती. मात्र ही घोषणा करून काही तास उलटत नाहीत तोच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाणार प्रकल्पाच्या भूसंपादनाची अधिसूचना रद्द करण्यात आलेली नाही, अशी प्रतिक्रिया दिल्याने नाणार येथील सभेला काही तास उलटत नाहीत तोच तोंडघशी पडण्याची वेळ शिवसेनेवर आली आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी नाणार येथील प्रकल्पासाठी निर्देशित करण्यात आलेल्या भागाला भेट दिली. त्यावेळी उपस्थित प्रकल्पग्रस्तांना संबोधित करताना उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी नाणार प्रकल्पासाठीच्या भूसंपादनाची अधिसूचना रद्द करण्यात आल्याची घोषणा केली होती. त्यावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री म्हणाले, " नाणार प्रकल्पासाठीच्या भूसंपादनाची अधिसूचना रद्द करण्याची घोषणा हे उद्योगमंत्र्यांचे वैयक्तिक मत आहे. प्रत्यक्षात ही अधिसूचना रद्द करण्यात आलेली नाही. अशी अधिसूचना रद्द करण्याचा अधिकार हा मुख्य सचिव समितीला असतो. मात्र सध्या तरी अधिसूचना रद्द करण्याच कुठलाही प्रस्ताव आलेला नाही. नाणार प्रकल्पासंदर्भात राज्य आणि कोकणच्या हिताचा विचार करून योग्य निर्णय घेतला जाईल."
दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी नाणार येथील प्रकल्पासाठी निर्देशित करण्यात आलेल्या भागाला भेट दिली. त्यावेळी उपस्थित प्रकल्पग्रस्तांना संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी नाणार प्रकल्पाबाबतची शिवसेनेची भूमिका स्पष्ट करतानाच सत्ताधारी भाजपा, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यावर चौफेर टीका केली. कोकणच्या भूमित आमची हाडामासाची, रक्ताची नाती जोडलेली आहेत. त्यांना विकत घेता येणार नाही. हा प्रकल्प इतकाच चांगला असेल तर तो गुजरातला घेऊन जा. इथे प्रकल्प लादायचा प्रयत्न करू नका. हा प्रकल्प नाणारमध्ये नाहीच, पण महाराष्ट्रातही होऊ देणार नाही असे सांगत उद्धव ठाकरेंनी जमिनी मोजणी होऊ देऊ देऊ नका, कुणी मोजणी करायला आलाच तर त्याला शिवसेना स्टाइलने उत्तर द्या, असे आवाहन उद्धव ठाकरेंनी केले होेते.