आता भारत जोडो साहित्य दिंडी; राहुल गांधींच्या यात्रेला १२० साहित्यिक, विचारवंत, कलावंतांचा पाठिंबा
By भारत दाढेल | Published: November 9, 2022 07:58 AM2022-11-09T07:58:44+5:302022-11-09T08:00:25+5:30
अलीकडच्या काळात काही कालबाह्य, असहिष्णू भ्रम निर्माण करून नवे आदर्श निर्माण केले जात आहेत.
नांदेड :
अलीकडच्या काळात काही कालबाह्य, असहिष्णू भ्रम निर्माण करून नवे आदर्श निर्माण केले जात आहेत. या विकृतीकरणाचा संसर्ग वाडी, वस्ती, तांडे, खेड्यापर्यंत पोहोचायला सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर लेखक, कवी, चित्रकार, कलावंत यांची भूमिका महत्त्वाची मानली जाते. सहिष्णू भारत घडविण्यासाठी ‘भारत जोडो’ यात्रेच्या निमित्ताने साहित्यिक मंडळी पुढे आली असून, त्यांनी ‘भारत जोडो साहित्य दिंडी’ स्थापन केली आहे.
राहुल गांधी यांची ‘भारत जोडो’ यात्रा देगलूरमार्गे महाराष्ट्रात दाखल झाली आहे. या यात्रेला राज्यातील १२० साहित्यिक, विचारवंत, कलावंतांनी पाठिंबा दिला असून यात्रेत सहभागी होण्यासाठी राज्यभरातील साहित्यिक, कलावंत नांदेड येथे दाखल झाले आहेत.
या दिंडीचे निमंत्रक प्रा. डॉ. दत्ता भगत, डॉ. जगदीश कदम, प्रा. श्रीकांत देशमुख, डॉ. विशाल पतंगे, विजय वाकोडे हे आहेत. या समितीच्या वतीने मंगळवारी स्थानिक साहित्यिकांची बैठक घेण्यात आली.
या साहित्यिकांचा पाठिंबा
वसंत आबाजी डहाके, डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, रा.रं. बोराडे, कौतिकराव ठाले पाटील, अनुराधा पाटील, फ.मुं. शिंदे, डॉ. लीला शिंदे, संदेश भंडारे, प्रा. राजन गवस, सुमती लांडे, प्रवीण बांदेकर, लक्ष्मीकांत देशमुख, श्रीपाल सबनीस, महावीर जोंधळे, इंदुमती जोंधळे, प्रा. सदानंद देशमुख, भु.द. वाडीकर, कवी पी. विठ्ठल, डॉ. शेषराव मोहिते, डॉ. नागोराव कुंभार, लोकनाथ यशवंत, डॉ. श्रीराम गव्हाणे, शिवा अंबुलगेकर, डॉ. उत्तम सावंत, प्रा. डॉ. मारोती कसाब, डॉ. रामचंद्र काळुंखे आदी यात्रेत सहभागी होतील.
भारत जोडो यात्रेत सहभागी होण्यासाठी राज्यभरातील साहित्यिक नांदेडमध्ये दाखल झाले आहेत. कळमनुरी येथे १२ नोव्हेंबर रोजी राहुल गांधी यांची भेट घेऊन साहित्यिक त्यांच्याशी संवाद साधणार आहेत, तसेच, त्यांना निवेदन देणार आहेत.
- डॉ. जगदीश कदम, समन्वयक