मुंबई - ज्येष्ठ आयपीएस अधिकारी नवल बजाज हे केंद्रात प्रतिनियुक्तीवर जात आहेत. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात (सीआयएसएफ) त्यांची प्रतिनियुक्ती करण्यात आली आहे. बजाज यांनी प्रतिनियुक्तीच्या आदेशानंतर पोलीस महासंचालक संजय पांडे यांची मंगळवारी भेट घेतली. बजाज हे सध्या अतिरिक्त पोलीस महासंचालक (आर्थिक गुन्हे) आहेत.
यापूर्वी राज्याचे पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल हे सीआयएसएफचे महासंचालक म्हणून केंद्रात प्रतिनियुक्तीवर गेले. तसेच महासंचालक (नागरी सुरक्षा) रश्मी शुक्लादेखील सीआयएसफमध्ये प्रतिनियुक्तीवर गेल्या आहेत. त्यापूर्वी मुंबईचे सहपोलीस आयुक्त संतोष रस्तोगी हे प्रतिनियुक्तीवर सीबीआयमध्ये गेलेले आहेत. आता नवल बजाज केंद्रात जात आहेत.
तत्कालिन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी झालेल्या मतभेदानंतर सुबोधकुमार जयस्वाल यांनी केंद्रात जाणे पसंत केले. रश्मी शुक्ला या आधीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळच्या मानल्या जात. महाविकास आघाडी सरकारने त्यांची राज्य गुप्तवार्ता आयुक्त पदावरून बदली करताना त्यांना पदोन्नती तर दिली पण महासंचालक (नागरी सुरक्षा) ही ‘साईड पोस्टिंग’ दिली. पोलीस उपमहानिरिक्षक मनोजकुमार शर्मा हे या आधीच प्रतिनियुक्तीवर सीआयएसएफमध्ये गेले आहेत.