ऑनलाइन लोकमत -
मुंबई, दि. 16 - विविध आरोपांमुळे अडचणीत सापडलेले राज्याचे महसूल मंत्री एकनाथ खडसे यांना राजीनामा द्यावा लागल्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या आणखी एका मंत्र्याचा भुखंड घोटाळा समोर आला आहे. भुसावळ जिल्ह्य़ातील मानपूर येथील जमीन खरेदीवरून जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. गिरीश महाजन यांनी कारखाना काढण्याच्या नावाखाली पाच एकर जमीन लाटल्याचा आरोप होत आहे.
लोकसत्ताने दिलेल्या वृत्तानुसार ‘तापीपूर्णा साखर कारखाना’ काढण्याच्या नावाखाली २००२ मध्ये गिरीश महाजन यांनी जमीन खरेदी केली होती. गिरीश महाजन यांनी वैयक्तिक नावावर पाच एकर जमीन फक्त १ लाख ११ हजार रुपयांमध्ये विकत घेतली. या कारखान्यात शेतकऱ्यांना नोकरी देऊ असं आश्वासन ही जमीन खरेदी करताना गिरीश महाजन यांनी दिलं होतं. विशेष म्हणजे एकनाथ खडसे हेच या कारखान्याचे मुख्य प्रवर्तक होते. मात्र, या साखर कारखान्याची नोंदणीही झाली नाही आणि तो कधीच अस्तित्वातही आला नाही.
महाजन यांनी ही जमीन आपल्या नावावर असल्याचे गेल्या १५ वर्षांत विधानसभा निवडणूक लढविताना शपथपत्रात दाखविलेले नाही. मात्र या जमिनीचा उल्लेख प्रतिज्ञापत्रात न केल्याने महाजनांनी निवडणूक शर्तींचा भंग केल्याचा आरोप काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे. गिरीश महाजन यांनी मात्र स्पष्टीकरण देताना ही जमीन कारखान्याची असल्याच्या समजुतीतून ती शपथपत्रात दाखवायचे अनवधानाने राहूनच गेल्याचं सांगितलं आहे.
या जमिनीतून उत्पन्नही नसल्याने प्राप्तीकर विवरणपत्रात ही त्याचा उल्लेख केला नाही. त्यासाठी मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची गरज नसून न्यायालय त्याबाबत उचित निर्णय देईल असंही गिरीश महाजन बोलले आहेत.