Ajit Pawar vs Sharad Pawar, Manikrao Kokate Conviction : राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे आणि त्यांचा भाऊ यांना एका खटल्यात नाशिक सत्र न्यायालयाने दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. यामुळे कोकाटे यांचे मंत्रिपदासह आमदारकीही जाण्याची शक्यता आहे. धनंजय मुंडे यांच्यात बाबतीत अजित पवार म्हणायचे की, गुन्हा सिद्ध होऊद्या. पण आता मात्र अजित पवार म्हणू शकणार नाही की गुन्हा सिद्ध होऊ द्या. आता तर कृषीमंत्री यांच्यावर गुन्हाही सिद्ध झाला असून जिल्हा सत्र न्यायालयाने शिक्षाही सुनावली आहे. आता महायुती सरकारने नैतिकतेचे उत्तम उदाहरण देत कोकाटे यांचा त्वरित राजीनामा घ्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केली. मुंबईत ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
"शिंदे सरकारची लाडकी बहीण योजना लाडक्या बहिणींच्या उत्कृष्टासाठी कधीच नव्हती ती फक्त निवडणुका जिंकण्यासाठी योजना होती. आता राज्य सरकारला लाडक्या बहिणींचा विसर पडला असून एक एक नवीन निकष लावत लाडक्या बहिणींची संख्या कमी करण्याचा डाव राज्य सरकारचा आहे. अशाप्रकारे लाडक्या बहिणीची घोर फसवणूक विद्यमान सरकारने केली आहे. राजकीय फायद्यासाठी लागू करण्यात आलेल्या या योजनेसाठी दरवर्षी ४५ हजार कोटी कुठून आणायचे असा प्रश्न आता वित्तमंत्री अजितदादांना पडलाय. लाडक्या बहिणीची मतं घेताना जे भरभरून आश्वासन देत होते, तेच आता जाचक अटी लावून भगिनींची संख्या कमी कशी करता येईल याच्या शोधात आहेत," असा टोला तपासेंनी लगावला.
"वास्तव पाहता लाडक्या बहिणींची काळजी राज्य सरकारला नाही. राज्यात महिलांविरोधात मोठ्या प्रमाणात अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहे. तसेच महिला व तरुणी मोठ्या प्रमाणात बेपत्ता होत आहे. मात्र राज्य सरकारला या संदर्भात काहीही पडलेलं नाही. राज्यात मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढत असताना या संदर्भात राज्य सरकार कुठलेही ठोस पावलं उचलत नाही आहे याची खंत तपासे यांनी व्यक्त केली. महाराष्ट्राला प्रगतीपथावर घेऊन जाण्यासंदर्भात सध्याच्या विद्यमान सरकारकडे कुठलेही व्हिजन नाही," असा तपासे यांनी केला.