आता शिंदे यांच्या गटावर अजित पवारांचे अतिक्रमण! शिंदेसेनेच्या मतदारसंघातही दौरे
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2023 06:27 AM2023-08-12T06:27:49+5:302023-08-12T06:28:13+5:30
राष्ट्रवादीच्या प्रदेश पदाधिकारी व नेत्यांची बैठक अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे यांनी शुक्रवारी मंत्रालयासमोरील पक्ष कार्यालयात घेतली.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारित असलेल्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचा आढावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेणे सुरू केल्यानंतर, दुसऱ्याच दिवशी शिंदे गटाचे खासदार असलेल्या मतदार संघांमध्येही राष्ट्रवादीचे मंत्री, नेते दौरे करतील, असे अजित पवार गटाने ठरविल्याने राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
राष्ट्रवादीच्या प्रदेश पदाधिकारी व नेत्यांची बैठक अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे यांनी शुक्रवारी मंत्रालयासमोरील पक्ष कार्यालयात घेतली. पक्षाचे नेते, मंत्री सप्टेंबरमध्ये लोकसभेच्या सर्व मतदारसंघांमध्ये पक्षवाढीसाठी दौरे करतील, असा निर्णय घेण्यात आला. त्यात शिंदे गटाच्या १३ खासदारांच्या मतदारसंघांचाही समावेश आहे. भाजपने काही महिन्यांआधीच शिंदेंचे खासदार असलेल्या मतदारसंघांमध्ये दौरे सुरू केले, सोबतच काही केंद्रीय मंत्र्यांना मैदानात उतरविले आहे.
वॉररूमवरून कोल्डवॉर
n पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या राज्य सरकारच्या समितीचे अध्यक्ष मुख्यमंत्री शिंदे आहेत. त्यांच्या अध्यक्षतेखालील वॉर रूमच्या माध्यमातून या प्रकल्पांचा आढावा घेतला जातो. मात्र, आता अजित पवार यांनी आपल्या अखत्यारित प्रकल्प व्यवस्थापन युनिट असा नियंत्रण कक्ष स्थापन केला, बैठकही घेतली.
n मुख्यमंत्र्यांच्या कामात अजित पवार यांचे हे अतिक्रमण असल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे वॉररूम शिंदेंच्या हाती की अजित पवारांच्या? असे कोल्डवाॅरचे चित्र आहे.
मुख्यमंत्र्यांच्या एका खुर्चीवर दोन उपमुख्यमंत्री डोळा ठेवून असून, हे गंमतजंमतचे सरकार आहे.
- नाना पटोले, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस
महायुती सरकारमधील तीन पक्षांची तोंडे तीन दिशांना आहेत. अजित पवार यांची ढवळाढवळ ही दुर्दैवी बाब आहे.
- विजय वडेट्टीवार
विरोधी पक्षनेते, विधानसभा