ऑनलाइन लोकमतपुणे, दि. 25 - बँक ऑफ महाराष्ट्रानं जवळपास 34 हजार ग्राहकांचे डेबिट कार्ड ब्लॉक केले आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव हे सर्व डेबिट कार्ड ब्लॉक केल्याचं बँक ऑफ महाराष्ट्राच्या सिक्युरिटी विभागानं सांगितलं आहे. बँकेनं आतापर्यंत 59 लाख डेबिट कार्ड ग्राहकांना वितरीत केली आहेत. बँक ऑफ महाराष्ट्रानं 21 हजार व्हिसा कार्ड आणि 13 हजार रुपे कार्ड ब्लॉक केले आहेत. विशेष म्हणजे ग्राहकांकडून कोणतीही फसवणुकीची तक्रार आली नसतानाही ही एटीएम बंद करण्यात आल्याची माहिती आता समोर येते आहे. संशयास्पद किंवा फसवणुकीचे व्यवहार आमच्या कोणत्याही शाखेतून झाले नाहीत. अशा प्रकारची कोणतीही तक्रार ग्राहकांकडून नोंदवली गेली नाही, असंही बँक ऑफ महाराष्ट्राचे आयटी विभागाचे महाव्यवस्थापक नरेंद्र कबरा यांनी सांगितलं आहे."आम्ही आमच्या ग्राहकांना कार्ड ब्लॉक केल्याची माहिती एसएमएसद्वारे पाठवली आहे. ज्यांना कोणाला हे कार्ड परराष्ट्रात वापरायचे असतील, त्यांनी बँकेच्या जवळच्या शाखेत जाऊन ते सुरू करून घ्यावेत, परराष्ट्रात जे या बँकेचे ग्राहक आहेत त्यांच्यापर्यंत आम्ही एसएमएस आणि इमेलद्वारे पोहोचलो आहोत. आम्ही त्यांचेही कार्ड ब्लॉक करण्यासाठी विनवणी केली आहे". असंही नरेंद्र कबरा म्हणाले आहेत.
तर याआधी देशातील सर्वात मोठी बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्टेट बँक आॅफ इंडियाने सहा लाख ग्राहकांची डेबिट कार्ड्स ब्लॉक केली होती. एटीएममध्ये व्हायरस घुसल्याच्या भीतीने बँकेने तात्काळ डेबिट कार्ड्स ब्लॉक केल्याचं सांगण्यात आले होते.